अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): एककीकडे समाज प्रगतीचे गोडवे गात असतानाच, दुसरीकडे चिमुरड्या मुलींच्या अब्रूवर डल्ला मारणारे विकृत नरधम मोकाट फिरत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या घारोड गावात एका नराधमाने मर्यादा ओलांडत दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, आरोपीला कठोरत कठोर शासन करण्याची मागणी जोर धरत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. ३ मे २०२६ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घारोड येथील फिर्यादीची ११ वर्ष ८ महिने वयाची मुलगी ‘संध्या’ (नाव बदललेले आहे) ही बाजारात जात होती. याच संधीचा फायदा घेत आरोपी सोपान गजानन दुतोंडे याने तिला जवळ बोलावले आणि अत्यंत वाईट उद्देशाने तिला कवठ्यात पकडून तिचा विनयभंग केला. चिमुरडीने आरडाओरड केली असता आरोपीने तिथून पळ काढला. घटनेची व्याप्ती एवढ्यावरच थांबत नाही. अंदाजे २०-२५ दिवसांपूर्वी याच आरोपीने गावातील दुसरी अल्पवयीन मुलगी ‘अनुष्का’ (वय १३ वर्षे) ही आपल्या मैत्रिणीसोबत गिरणीवर दळण दळण्यासाठी जात असताना, तिचाही हात पकडून विनयभंग केला होता. धाक दपटशामुळे ही घटना समोर आली नव्हती, मात्र ताज्या घटनेनंतर पीडित मुलींच्या कुटुंबीयांनी धाडस दाखवत पोलीस स्टेशन गाठले.
या प्रकरणी हिवरखेड पोलिसांनी आरोपी सोपान दुतोंडे याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ७४, ७५ (२), पोक्सो कायद्याचे कलम ८ आणि १०, अट्रॉसिटी कायद्याचे कलम ३(१)(w)(१), ३(२)(va) अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील आणि हिवरखेड ठाणेदार संदीप पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. १० वाजेपासूनच पोलीस पथक गावात तळ ठोकून असून पुराव्यांची जमवाजमव सुरू आहे. गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील हे करीत आहेत.
विकृतांना भरचौकात फाशी द्या!
घारोड गावात या घटनेनंतर तणावपूर्ण शांतता असून ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप आहे. आमच्या मुली सुरक्षित नसतील तर प्रशासनाचा धाक कुठे आहे?, असा सवाल आता नागरिक विचारत आहेत. आरोपी सोपान दुतोंडे याने केवळ विनयभंग केला नसून, दोन निष्पाप जीवांच्या मनावर कायमचा ओरखडा ओढला आहे. अल्पवयीन मुलींशी अशा प्रकारचे नीच कृत्य करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा द्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
