निषेधार्थ: रयतेच्या राजाच्या महाराष्ट्रात शिवआरतीवर ‘बंदी’?; धाड पोलिसांचा ‘शिवद्रोही’ कारभार!

धाड,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीच्या जोरावर या मातीतील देवळं आणि संस्कृती वाचली, त्याच महाराजांच्या स्मारकावर आरती आणि पोवाडे वाजवण्यास धाड पोलिसांनी नकार दिला आहे. शांतता आणि सुव्यवस्थेचे ‘तुणतुणे’ वाजवत पोलिसांनी दिलेले हे उत्तर म्हणजे शिवभक्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असून, हा थेट ‘शिवद्रोह’ असल्याची भावना आता जनमानसात उमटू लागली आहे.

धाड येथील छत्रपती शिवशंभु स्मारक समितीने स्मारकावर दररोज सकाळी आणि सायंकाळी आरती तसेच शिवरायांचे पोवाडे वाजवण्यासाठी लाऊडस्पीकरची परवानगी मागितली होती. मात्र, पोलिसांनी ही परवानगी नाकारताना दिलेली कारणे अतिशय धक्कादायक आणि दुजाभाव करणारी आहेत.

  • पोलीस प्रशासनाने हा निर्णय बदलून सन्मानाने परवानगी दिली नाही, तर हा वणवा संपूर्ण जिल्ह्यात पेटल्याशिवाय राहणार नाही. प्रशासनाने शिवभक्तांच्या संयमाचा अंत पाहू नये!, अशा शब्दांत समिती अध्यक्ष वैभवराजे मोहिते यांनी आपला रोख स्पष्ट केला आहे.

पोलिसांनी आपल्या उत्तरात २०२४ मधील एका जुन्या घटनेचा संदर्भ दिला आहे. वास्तविक पाहता गुन्हेगारांवर वचक बसवणे हे पोलिसांचे काम आहे. मात्र, धाड पोलीस गुन्हेगारांच्या नावाखाली शिवभक्तांच्या श्रद्धेचा गळा घोटत आहे. स्मारकाच्या १०० मीटर अंतरावर दवाखाने, बँका आणि पोलीस स्टेशन असल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे. पण याच परिसरात इतर वेळी होणाऱ्या आवाजांकडे पोलीस डोळेझाक का करतात? फक्त शिवरायांच्या आरतीनेच ध्वनी प्रदूषण होते का? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.

हा दुजाभाव कोणासाठी?

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उच्च न्यायालयाच्या नियमांचे पालन करून ध्वनी मर्यादा पाळून लाऊडस्पीकरला परवानगी दिली जाते. मग धाडमध्येच असा वेगळा न्याय का? शिवरायांचे पोवाडे म्हणजे काय कोणाविरुद्ध केलेली घोषणाबाजी आहे का? की स्फोटक वक्तव्य? पोवाडे हे तर या मातीचे स्फूर्तीगीत आहेत, पण पोलिसांना त्यातही ‘शांतता भंग’ होताना दिसत आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलिसांचे पत्र म्हणजे केवळ प्रशासकीय उत्तर नसून ती शिवभक्तांच्या अस्मितेवर केलेली चिखलफेक आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापले, त्यांच्याच राज्यात त्यांच्या स्मारकासमोर नतमस्तक होताना आता पोलिसांची परवानगी लागणार का?, असा भावनिक प्रश्न स्थानिक जनता विचारत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!