अजय टप
मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): शहरातील वाढत्या अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी मलकापूर शहर पोलिसांनी कडक भूमिका घेत धडाकेबाज कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी अवैध धंदे, वाहतूक नियमांची पायमल्ली, दारूबंदी तसेच वरली मटका यांसारख्या गैरप्रकारांविरोधात जोरदार कारवाई करून कायदा सुव्यवस्था अबाध्घ्ति राखण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
मलकापूर शहर पोलिसांच्या या विशेष मोहिमेमुळे अवैध धंदे करणार्यांचे चांगलेच धाबे दणाणले असून शहरात पोलिस प्रशासनाचा वचक निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरात कायद्याचे राज्य कायम ठेवण्यासाठी पोलिसांनी राबविलेल्या या मोहिमेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. १ जानेवारी २०२६ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत दारूबंदी अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईत पोलिसांनी तब्बल ८२ केसेस दाखल करून ८२ आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाई दरम्यान ८२ हजार ३६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच वरली मटका प्रकरणात ५६ केसेस नोंदवून ५६ आरोपींवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून २५ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याशिवाय वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांविरोधातही पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. विनापरवाना वाहन चालविणे, ट्रिपल सीट, हेल्मेटचा वापर न करणे, अवैधरित्या वाहन पार्किंग करणे आदी प्रकारांवर पोलिसांकडून सातत्याने कारवाई सुरू असल्याने वाहनचालकांमध्येही शिस्त निर्माण होत आहे.
पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या नेतृत्वाखाली मलकापूर शहर पोलिसांनी राबविलेल्या या मोहिमेमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून अवैध व्यवसाय करणार्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. ‘अवैध धंद्यांना कोणतीही पाठीशी घालण्यात येणार नाही, कायद्याचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कारवाई केली जाईल,’ असा इशाराच पोलिस प्रशासनाने या कारवाईतून दिला आहे.
शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने घेतलेली ही आक्रमक भूमिका आगामी काळातही कायम राहणार असल्याचे बोलले जात असून नागरिकांनीदेखील पोलिसांच्या या मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
