अजय टप
मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो) : माहेरहून पैसे आणण्याच्या कारणावरून सातत्याने होत असलेल्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून एका विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना विवरा (ता. मलकापूर) येथे घडली होती. या प्रकरणी पती, सासू, सासरा, दीर व नणंद अशा पाच जणांविरुद्ध दसरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या पो.स्टे. फिर्याद माहितीनुसार, सरिता धनराज पाटील या विवाहितेला माहेरहून पैसे आणावेत, या कारणावरून तिचे सासरे अशोक शामराव पाटील, सासू इंद्रायणीबाई अशोक पाटील, दीर राजेश अशोक पाटील, पती धनराज अशोक पाटील (सर्व रा. विवरा, ता. मलकापूर) तसेच नणंद अक्काबाई निलेश पाटील (रा. ढालसिंगी, ता. जामनेर) हे नेहमी मारहाण, शिवीगाळ व जिवे मारण्याच्या धमक्या देऊन त्रास देत असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या सततच्या त्रासाला कंटाळून सरिता पाटील यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. मृत विवाहितेचा भाऊ वैभव जानकिराम पाटील (वय २२, रा. सूरवाडा, ता. बोदवड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून दसरखेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ८० व ८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वारे करीत आहेत.
