अजय टप
बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): जळगाव जामोद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजुरा येथे घडलेल्या बहुचर्चित ‘सर कटी लाश’ प्रकरणात निष्पाप लोकांना गोवून पोलीस दलाचे धिंडवडे काढणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पोलीस उपनिरीक्षकासह चार पोलीस अंमलदारांना अखेर आज, २ जून रोजी निलंबित करण्यात आले. खामगावचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी या प्रकरणाचा चौकशी अहवाल सादर केल्यानंतर पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी ही धडक कारवाई केली. या कारवाईमुळे बुलढाणा पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे, पोलीस अंमलदार **एजाज रफिक खान, अमोल रमेश शेजोळ आणि अजिस रेहमान परसुवाले, अशी निलंबन करण्यात आलेल्यांची नावे आहेत. २९ मे रोजी त्यांची थेट नियंत्रण कक्षात उचलबांगडी करण्यात आली होती, आता त्यांच्यावर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली आहे.
राजुरा शिवारात २६ एप्रिल रोजी एका अज्ञात तरुणीचा शिर नसलेला आणि अर्धवट जळालेला मृतदेह आढळला होता. या प्रकरणाचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत बेजबाबदारपणाचे प्रदर्शन घडवले. मध्यप्रदेशातील खकनार येथून बेपत्ता असलेली तरुणी शिवानी कलमेकर हिचाच हा मृतदेह असल्याचे भासवत, एलसीबीने थेट शिवानीच्या निष्पाप वडील आणि भावाला खुनाच्या आरोपाखाली बेड्या ठोकल्या. पोलिसांनी ज्या तरुणीच्या हत्येचा ‘बनावट’ तपास पूर्ण करून तिच्या नातेवाईकांना तुरुंगात धाडले होते, तीच शिवानी कलमेकर २८ मे रोजी चक्क सुखरूप आणि जिवंत पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली! मृत मानलेली मुलगी जिवंत समोर आल्याने एलसीबीच्या तपासाचे अक्षरशः धिंडवडे निघाले. “चोर सोडून संन्याशाला फाशी” देण्याचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी उपरोक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लाइन हजर करून अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्याकडे चौकशी दिली होती. दरम्यान सदर प्राप्त झाला असून अहवालात दोषी आढळल्यानंतर अखेर आज या चौघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
गृहविभाग धाडस दाखवणार का?
‘सर कटी लाश’ प्रकरणाने पोलीस दलातील तपासाच्या दर्जावर आणि संवेदनशीलतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. खालच्या दर्जाच्या कर्मचाऱ्यांनी निष्पाप बाप-लेकाला कोठडीत सडवले, यावर निलंबनाची कारवाई झाली हे ठीक; पण या गंभीर गुन्ह्याचा तपास सुरू असताना ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्य आरोपींना स्वतः ‘इंटरॉगेट’ करण्याची साधी तसदीही घेतली नाही, त्यांचे काय?, एवढ्या मोठ्या खुनाच्या गुन्ह्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पर्यवेक्षण फक्त कागदावरच होते का? की कनिष्ठांनी दिलेल्या ‘फायनल रिपोर्ट’वर डोळे झाकून सह्या ठोकणे हेच वरिष्ठांचे काम उरले आहे? केवळ पीएसआय आणि अंमलदारांना बळीचा बकरा बनवून वरिष्ठ अधिकारी स्वतःचे हात झटकू शकत नाहीत. या संपूर्ण प्रकरणात संशयाची सुई वरच्या पातळीपर्यंत जाते. त्यामुळे आता गृहविभाग या प्रकरणात गांधारीची भूमिका घेणार की कर्तव्यात कसूर करणाऱ्या ‘त्या’ बड्या अधिकाऱ्यांवरही कारवाईचे धाडस दाखवणार?, हाच बुलढाणा आणि महाराष्ट्रातील जनतेचा कळीचा प्रश्न आहे.
बोकड्या पार्टीचे काय?
शिस्तप्रिय पोलीस खात्यात बेशिस्तपणे वागत धाड पोलिसांनी ओली पार्टी केली होती. या संदर्भात ‘पुण्यनगरी’मध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. नव्हेतर यासंदर्भातील भरमसाठ पुरावे देखील वरिष्ठांकडे सुपूर्द करण्यात आले. या घटनेला बऱ्याच दिवसांचा कालावधी उलटल्यानंतरही संबंधितांवर कोणतीच कारवाई करण्यात आल्याचे दिसत नाही. त्यामुळे सदर प्रकरणात कुठे पाणी तर मुरले नाही ना?, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
