बुलढाणा, (प्रतिनिधी):छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलच्या विधानांवरून आणि ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून सध्या बुलढाणा जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर, आज २९ एप्रिल रोजी युवक काँग्रेसच्या वतीने येथील संगम चौकात जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान आमदार संजय गायकवाड समर्थक आणि युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने काही काळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने मोठा अनर्थ टळला.
भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि इतर पुरोगामी संघटनांनी आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात आंदोलन केले होते. हे आंदोलन चिरडल्या गेल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. या पार्श्वभूमीवर, आज युवक काँग्रेसने संविधानिक मार्गाने आपला निषेध नोंदवण्याचे ठरवले. संगम चौकातील शिवस्मारक परिसरात कार्यकर्त्यांनी एकत्र येत ‘शिवाजी कोण होता?’, या पुस्तकाचे सामूहिक वाचन केले. आंदोलनावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. “छत्रपतींचा अपमान, नाही सहेगा हिंदुस्तान”, “तुमचे आमचे नाते काय? जय भवानी, जय शिवराय!”, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केला. या आंदोलनाचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी केले. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संदीप शेळके, शहराध्यक्ष दत्ता काकस, विश्वजित पडोळ, शिवराज पाटील यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
समर्थक आणि आंदोलक आमने-सामने
आंदोलन सुरू असतानाच आमदार संजय गायकवाड यांचे समर्थक आणि आंदोलक आमने-सामने आले. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने वातावरणात मोठी ठिणगी पडली. दोन्ही गटांकडून एकमेकांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. परिस्थिती इतकी गंभीर झाली होती की, कोणत्याही क्षणी शारीरिक संघर्ष होण्याची चिन्हे दिसत होती. युवक काँग्रेसचे पदाधिकारी आपल्या भूमिकेवर ठाम होते, तर गायकवाड समर्थकही मागे हटायला तयार नव्हते.
पोलिसांची सतर्कता आणि मध्यस्थी
शहरातील या वाढत्या तणावाची दखल घेत पोलीस प्रशासनाने तत्काळ मोठा फौजफाटा तैनात केला होता. पोलिसांनी दोन्ही गटांच्या मध्यभागी कडे करत त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूंच्या नेत्यांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांच्या या चोख बंदोबस्तामुळे आणि मध्यस्थीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही आणि संभाव्य हिंसाचार टळला. तरीही, बराच वेळ परिसरात तणावाचे सावट होते.
राजकीय संघर्षाला धार
बुलढाण्यात गेल्या काही दिवसांपासून पुरोगामी संघटना आणि आमदार गायकवाड यांच्यात संघर्ष उफाळून आला आहे. युवक काँग्रेसने आज या संघर्षात उडी घेतल्याने हा वाद आता अधिक व्यापक होण्याची चिन्हे आहेत. आम्ही लोकशाही आणि संविधानिक मार्गाने आंदोलन करत आहोत, मात्र सत्तेच्या जोरावर आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप युवक काँग्रेसच्या नेत्यांनी यावेळी केला. आजच्या या आंदोलनामुळे जिल्ह्याच्या राजकारणात ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक आणि छत्रपतींचा सन्मान हे मुद्दे पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहेत. पोलिसांनी सध्या परिसरात शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.