बुलढाणा पुन्हा खळबळ: लोणार आणि मेहकर तालुक्यातून दोन विवाहितांसह दोन चिमुकले बेपत्ता!

अजय टप

मलकापूर,(प्रतिनिधी): बुलढाणा जिल्ह्यातून बेपत्ता होणाऱ्या महिलांच्या घटनांमध्ये चिंतेत टाकणारी वाढ होत असून, अवघ्या २४ तासांत लोणार आणि मेहकर तालुक्यातून दोन विवाहित महिला गूढरीत्या बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, मेहकर तालुक्यातील घटनेत एका २७ वर्षीय मातेसोबत तिचे ५ आणि ३ वर्षांचे दोन निष्पाप चिमुकलेही गायब झाले आहेत. या दोन्ही घटनांमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

धानोरा येथून १९ वर्षीय विवाहिता बेपत्ता

लोणार: तालुक्यातील धानोरा येथील २६ वर्षीय तरुण शेतकरी रवी शेषराव पिसे यांची १९ वर्षीय पत्नी तन्वी रवी पिसे ही सोमवार, २७ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास बेपत्ता झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, रवी पिसे आणि त्यांचे कुटुंब सोमवारी रात्री घरात झोपलेले होते. रात्री ११.३० ते मंगळवारी पहाटे २.३० वाजेच्या सुमारास तन्वी कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली. सकाळी जेव्हा घरच्यांना ती दिसली नाही, तेव्हा त्यांनी तातडीने गाव, परिसर आणि नातेवाईकांकडे तिचा शोध घेतला. मात्र, सर्वत्र शोध घेऊनही तन्वीचा कोणताही पत्ता लागला नाही. तन्वी पिसे यांचे वय १९ वर्ष असून उंची साधारण ५ फूट ६ इंच आहे. रंग गोरा, केस लांब असून अंगात पंजाबी ड्रेस आणि पायात सँडल आहे. या प्रकरणी लोणार पोलिसांत मिसिंग दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार राजेश जाधव हे करत आहेत.

मातेसह दोन चिमुकल्यांचे गूढ पलायन

दुसरी घटना मेहकर तालुक्यातील लोणी गवळी गावात घडली असून ही घटना अधिकच काळजाचा ठोका चुकवणारी आहे. येथील रामचंद्र दिलीप जाधव यांची २७ वर्षीय पत्नी लक्ष्मी रामचंद्र जाधव ही तिच्या अभय (वय ५ वर्षे) आणि निर्भय (वय ३ वर्षे) या दोन मुलांसह मंगळवारी दुपारपासून बेपत्ता झाली आहे. रामचंद्र जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २८ एप्रिल रोजी दुपारी ३.१५ ते सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान लक्ष्मी दोन्ही मुलांसह घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेली. बराच वेळ झाला तरी ती परत न आल्याने आणि नातेवाईकांकडेही माहिती न मिळाल्याने रामचंद्र जाधव यांनी डोणगाव पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. बेपत्ता लक्ष्मी जाधव यांचा रंग गोरा असून बांधा मजबूत आहे. उंची साडेचार फूट आहे. अंगात पांढऱ्या रंगाचा टॉप, लाल रंगाची लेगीज आणि पायात काळ्या सँडल आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यांच्या डाव्या हातावर ‘रामचंद्र जाधव’ असे गोंदलेले आहे आणि छातीवर जुनी जळल्याची खूण आहे. या प्रकरणी डोणगाव पोलिसांनी मिसिंग दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार संजय घिके हे करीत आहेत. अशा प्रकारे महिला बेपत्ता होण्याच्या घटनांमुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!