https://hindvarta.com/wp-content/uploads/2026/04/WhatsApp-Image-2026-04-29-at-10.50.45-AM.jpeg

संतापजनक: व्हिडिओ कॉल करून महिला पदाधिकाऱ्याला दाखवले पुरुषाचे गुप्तांग; पीडित महिला प्रतिष्ठित पक्षाच्या महिला कार्यकारिणी सदस्य; बुलढाणा पोलिसांत गुन्हा दाखल

अजय टप

मलकापूर,(प्रतिनिधी): जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राजकारणात २५ वर्षांपासून सक्रिय असलेल्या आणि एका प्रतिष्ठित पक्षाच्या महिला कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत असलेल्या ५८ वर्षीय महिलेला मध्यरात्री अज्ञात नंबरवरून अश्लील व्हिडिओ कॉल आणि विकृत फोटो पाठवून विनयभंग केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे बुलढाणा शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, सायबर गुन्हेगारांचे धाडस किती वाढले आहे, याचे हे विदारक चित्र समोर आले आहे.

बुलढाणा शहरात राहणाऱ्या ५८ वर्षीय फिर्यादी महिला या एका राजकीय पक्षामध्ये गेल्या २५ वर्षांपासून निष्ठावान कार्यकर्त्या म्हणून काम करत आहेत. सध्या त्या एका बड्या राजकीय पक्षाच्या महिला कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत. २८ एप्रिल २०२६ च्या मध्यरात्री १.४० वाजेच्या सुमारास त्या आपल्या राहत्या घरी गाढ झोपेत असताना, त्यांच्या मोबाईलवर एका अज्ञात नंबरवरून वारंवार व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल येऊ लागले. मध्यरात्री अनोळखी नंबर असल्याने त्यांनी तो कॉल उचलला नाही. मात्र, त्यानंतर संबंधित विकृत व्यक्तीने थेट अश्लीलतेची सीमा ओलांडली. त्या नंबरवरून फिर्यादींच्या व्हॉट्सॲपवर पुरुषाच्या गुप्तांगाचा फोटो पाठवण्यात आला. हा अत्यंत बीभत्स प्रकार पाहून फिर्यादी महिला प्रचंड हादरून गेल्या. त्यांनी तात्काळ तो नंबर ब्लॉक केला आणि या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली.

या प्रकरणी पीडिताने बुलढाणा शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी कलम ६७ (माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २०००) सह कलम ७९ (भारतीय न्याय संहिता) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक रवी राठोड यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यांच्यासोबत एएसआय खवले यांनीही पाहणी केली. मध्यरात्री दीड ते दोन वाजेच्या दरम्यान पोलिसांनी फिर्यादींच्या घरी जाऊन घटनेचा तपशील घेतला असून, संबंधित मोबाईल धारकाचा शोध सुरू केला आहे.

महिला सुरक्षित कधी होणार?

एक महिला जी गेल्या दोन दशकांपासून सार्वजनिक जीवनात वावरत आहे, समाजाचे प्रश्न मांडत आहे, तीच महिला जर स्वतःच्या घरात मध्यरात्री सुरक्षित नसेल, तर सामान्यांचे काय? सायबर विकृतीचा हा प्रकार केवळ एका महिलेचा विनयभंग नसून, तो डिजिटल युगातील सुरक्षिततेवर उठवलेले प्रश्नचिन्ह आहे. झोपलेल्या अवस्थेत एका वृद्ध महिलेला अशा प्रकारे त्रास देणे, हे त्या गुन्हेगाराच्या निर्लज्जपणाचा कळस आहे.

सायबर गुन्हेगारांना चाप बसणार का?

सध्या व्हॉट्सॲपच्या माध्यमातून महिलांना टार्गेट करण्याचे प्रमाण वाढले आहे. ‘डिस्प्ले पिक्चर’ वरून किंवा राजकीय ओळखीचा फायदा घेऊन त्यांचे नंबर मिळवले जातात आणि त्यानंतर असे घाणेरडे प्रकार केले जातात. बुलढाणा पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीचा शोध घेण्यासाठी तांत्रिक पथकाची मदत घेतली आहे. पोनी रवी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून, या विकृत नराधमाला पोलीस कधी बेड्या ठोकतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!