बुलढाणा,(प्रतिनिधी): सह्याद्रीच्या कडाकपारीतून येणारा घोड्यांच्या टापांचा आवाज… नगारखान्यातून घुमणारा सनई-चौघड्यांचा मंगल सूर… भगव्या ध्वजांची डौलाने होणारी फडफड आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या जयघोषाने दुमदुमलेला आसमंत! निमित्त होते, चिखली तालुक्यातील ऐतिहासिक करवंड या पावन भूमीत तब्बल ३७० वर्षांनंतर पुन्हा एकदा शिवकाळाचा जिवंत अनुभव देणाऱ्या ‘प्रथम ऐतिहासिक करवंड महोत्सवाचे’.

१५ एप्रिल १६५७ रोजी याच भूमीत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी गुणवंताबाई साहेब यांचा ऐतिहासिक विवाह सोहळा संपन्न झाला होता. त्या मंगल क्षणांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आयोजित या सोहळ्याने उपस्थित जनसमुदायाला साक्षात साडेतीनशे वर्षे मागे घेऊन जात शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाचे दर्शन घडवले.

या ऐतिहासिक सोहळ्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. करवंड येथील पडझड झालेल्या बुरुजांकडे आणि ऐतिहासिक राजवाड्याच्या अवशेषांकडे पाहत त्यांनी अत्यंत भावूक उदगार काढले. हा केवळ एक उत्सव नाही, तर आपल्या अस्मितेचे जागरण आहे. महाराणी गुणवंताबाई साहेब आणि शिवरायांचा हा विवाह स्वराज्याच्या बांधणीतील एक अभेद्य दुवा होता. या मातीचा इतिहास जपणे ही आपली जबाबदारी आहे. करवंड येथील ऐतिहासिक किल्ल्याच्या पुनरुज्जीवनासाठी आणि बुरुजांच्या संवर्धनासाठी शासन स्तरावरून ‘भरीव निधी’ उपलब्ध करून दिला जाईल, सांस्कृतिक कार्य विभाग आणि मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून येथे महाराणी गुणवंताबाई यांचा भव्य पुतळा उभारला जाईल, ऐतिहासिक राजवाड्याची शास्त्रोक्त पद्धतीने डागडुजी केली जाईल आणि या परिसराचा विकास जागतिक दर्जाच्या पर्यटन स्थळासारखा केला जाईल, अशी महत्त्वाची घोषणा देखील मंत्री महोदयांनी यावेळी केली.
या महोत्सवाचे आयोजन सांस्कृतिक कार्य विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि करवंड महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर विधान परिषद आ. धिरज लिंगाडे, आ. श्वेता महाले, आ. संजय गायकवाड, आ. सिद्धार्थ खरात, आ. मनोज कायंदे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, राजेंद्र पोळ आणि उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांची उपस्थिती होती. महोत्सवाचे अध्यक्ष अरविंद देशमुख यांनी या ऐतिहासिक स्थळाच्या महत्त्वावर प्रकाश टाकला.
आ. श्वेता महाले यांनी केला महोत्सवाच्या प्रवासाचा उलगडा
सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावावर तत्काळ मोहोर उमटवल्यामुळेच आज हा सोहळा प्रत्यक्षात उतरला आहे. मात्र, इतिहासाचे जतन करताना त्यांनी वर्तमानातील समस्यांकडेही मंत्र्यांचे लक्ष वेधले. चिखली ते बुलढाणा दरम्यान होणारी वाहतूक कोंडी आणि खराब रस्त्यांमुळे २० मिनिटांचा प्रवास सव्वा तासावर गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यावर मंत्र्यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.