अभिनय बोर्डे
धाड, (प्रतिनिधी): बुलढाणा जिल्ह्यातील धाड पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या मर्दडी देवीच्या घाटात पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. गुरुवारी तिसऱ्या पहाराच्या सुमारास एका इसमास शस्त्राचा धाक दाखवून लुटल्याची खळबळजनक घटना घडली. मात्र, घटनेची माहिती मिळताच धाड पोलिसांनी दाखवलेली चपळता आणि फिल्मी स्टाईलने केलेला पाठलाग यामुळे एका दरोडेखोराला पकडण्यात यश आले असून, त्याचे अन्य साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले आहेत.
वरूड येथील रहिवासी असलेले एक गृहस्थ आपल्या कामानिमित्त दुधा येथून धाडच्या दिशेने मोटारसायकलने येत होते. सायंकाळची वेळ आणि मर्दडी देवीच्या घाटातील नागमोडी वळणे असा प्रवास सुरू असताना, अचानक काही अज्ञात तरुणांनी त्यांची दुचाकी अडवली. घाटातील एका निर्जन ठिकाणी दबा धरून बसलेल्या या तरुणांनी अचानक समोर येत फिर्यादीला थांबण्यास भाग पाडले. फिर्यादी काही समजण्याच्या आतच दरोडेखोरांनी त्यांच्यावर शस्त्रांचा धाक धरला. “गपचूप तुझ्याकडची बॅग देऊन टाक, नाहीतर याद राखून ठेव,” अशी धमकी देत दरोडेखोरांनी त्यांच्याकडील बॅग हिसकावून घेतली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे फिर्यादी प्रचंड घाबरले होते. लुटमार केल्यानंतर आरोपींनी जंगलाच्या दिशेने पोबारा केला. लूट झाल्यानंतर फिर्यादीने जराही वेळ न घालवता तातडीने धाड पोलीस स्टेशनशी संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य ओळखून धाड पोलिसांनी तात्काळ ताफा तैनात केला आणि घटनास्थळ गाठले.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत असतानाच संशयितांच्या हालचाली लक्षात घेतल्या. पोलिसांनी चहुबाजूंनी वेढा घालत आरोपींचा पाठलाग सुरू केला. घाटातील झाडाझुडपांतून चाललेला हा पाठलाग एखाद्या थ्रिलर चित्रपटाच्या दृश्यासारखा होता. पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे दरोडेखोरांची चांगलीच पळताभुई थोडी झाली. अखेर पोलिसांनी छत्रपती संभाजी नगर येथील एका चोरट्याला शिताफीने झडप घालून पकडले, मात्र त्याचे इतर साथीदार घनदाट झाडीचा फायदा घेत पसार होण्यात यशस्वी झाले.
या प्रकरणी वृत्त लिहीपर्यंत धाड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पकडलेल्या आरोपीकडून चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याचे प्रयत्न सुरू असून, फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.
स्थानिक टोळीचा संशय?
पकडण्यात आलेल्या आरोपीकडून प्राथमिक चौकशी सुरू असून, फरार झालेले अन्य आरोपी हे धाड परिसरातीलच असावेत असा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या टोळीने यापूर्वीही अशा प्रकारच्या चोऱ्या केल्या आहेत का, याचा तपास आता पोलीस करत आहेत.
घाटातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
मर्दडी देवीच्या घाटात यापूर्वीही प्रवाशांना लुटण्याचे प्रकार घडले आहेत. घाटातील निर्जन रस्ते आणि मोबाईल नेटवर्कची असलेली समस्या यामुळे गुन्हेगारांचे फावते आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी या भागात गस्त वाढवावी, अशी मागणी जोर धरत आहे.
