अजय टप
मोताळा,(प्रतिनिधी): बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. भरदिवसा एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची घटना जुन्या मलकापूर रोडवर घडली आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, बोराखेडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
तालखेड (ता. मोताळा) येथील रहिवासी सुनील महादेव सपकाळ यांची १७ वर्षीय मुलगी, निकीता सुनिल सपकाळ, ही मोताळा येथील जुन्या मलकापूर रोडवर असलेल्या ‘भोकरे टेलर क्लासेस’मध्ये शिलाई कामाचे प्रशिक्षण घेत होती. मंगळवार, २१ एप्रिल २०२६ रोजी नेहमीप्रमाणे निकीता आपल्या घराून क्लाससाठी मोताळा येथे आली होती. दुपारी १ वाजेच्या सुमारास निकीताचा क्लास संपला. प्रत्यक्षदर्शींनी तिला क्लासच्या बाहेर पडताना पाहिले होते, मात्र त्यानंतर ती घरी परतलीच नाही. सायंकाळपर्यंत निकीता घरी न आल्याने सपकाळ कुटुंबीयांनी तिची सर्वत्र शोधाशोध सुरू केली. नातेवाईक, मैत्रीणी आणि क्लासच्या ठिकाणी चौकशी करूनही तिचा कुठेही पत्ता लागला नाही.
अज्ञात इसमाचे ‘जाळे’ आणि अपहरण
तपासादरम्यान प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे की, कोणीतरी अज्ञात इसमाने तिला काहीतरी आमिष दाखवून किंवा फूस लावून जुन्या मलकापूर रोडवरून पळवून नेले आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, वडील सुनील सपकाळ यांनी तात्काळ बोराखेडी पोलीस स्टेशन गाठून दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी शेंगेपल्लु हे करीत आहेत. जुना मलकापूर रोड हा वर्दळीचा भाग आहे. या परिसरातील दुकाने आणि पेट्रोल पंपांवरील सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासात अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. दुपारी १ वाजताच्या सुमारास निकीता कोणासोबत दिसली होती का? किंवा तिला जबरदस्तीने एखाद्या वाहनात बसवण्यात आले का? याचा शोध पोलीस घेत आहेत.
