अजय टप
जळगाव जामोद/शेगाव, (प्रतिनिधी): शांत समजल्या जाणाऱ्या जलंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीने डोके वर काढले असून, केवळ २४ तासांच्या आत दोन खळबळजनक घटना समोर आल्या आहेत. रक्ताच्या नात्यातील ओलावा संपल्याचे विदारक चित्र या घटनांमधून दिसत असून, एका घटनेत पत्नीने आपल्या मुलासह मिळून सासूचे डोके फोडले, तर दुसऱ्या घटनेत पैशांच्या व्यवहारावरून सख्ख्या भावांनीच भावावर ‘फायटर’ने प्राणघातक हल्ला चढवला. या दोन्ही घटनांमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
घटना १: ‘सोबत राहू’ असे म्हणणे पडले महागात; पत्नीने मुलाच्या मदतीने सासूचे डोके फोडले!
पहिली घटना तरोडा (डी) येथे घडली असून, येथे पती-पत्नीमधील वादाने हिंसक वळण घेतले. कौटुंबिक सौख्यासाठी करण्यात आलेली विनंती रक्ताच्या थारोळ्यात संपली.
तरोडा येथील रहिवासी अनिल मुंडे (वय ४० वर्षे) यांनी आपली पत्नी वंदना मुंडे हिला “आपण एकत्र राहू” असे सांगून संसार सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, हीच बाब आरोपी पत्नीला खटकली. रागाच्या भरात आरोपी वंदना मुंडे आणि तिचा मुलगा अमोल मुंडे (वय १५ वर्षे) यांनी मिळून फिर्यादीच्या आईवर (सासूवर) हल्ला चढवला. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने घरातील एका वस्तूने सासूच्या डोक्यावर डाव्या बाजूला जोरदार प्रहार केला. हा हल्ला इतका भीषण होता की, सासूचे डोके फुटून घटनास्थळी रक्ताचा सडा पडला. जखमी वृद्धेला तातडीने वैद्यकीय उपचारासाठी हलवण्यात आले.
याप्रकरणी अनिल मुंडे यांच्या तक्रारीवरून जलंब पोलिसांनी आरोपी वंदना मुंडे आणि अमोल मुंडे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५, ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार मंदार पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार नन्हेखा तडवी हे करीत आहेत.
घटना २: पहुरजिरा येथे भावा-भावांमध्ये रक्ताचा खेळ; फायटरने सख्ख्या भावावर वार!
दुसरी घटना पहुरजिरा येथील भाजीपाला बाजार परिसरात घडली. येथे पैशांच्या व्यवहारातून सख्ख्या भावांनीच आपल्या भावाला रक्ताच्या थारोळ्यात पाडले.
फिर्यादी शेख अर्शद शेख खलील ( वय ३५ वर्षे) रा. खामगाव हे आपल्या हक्काचे पैशांचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी पहुरजिरा येथे आले होते. यावेळी त्यांचे सख्खे भाऊ शेख सोहील आणि शेख शोयब यांच्याशी त्यांचा वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपींनी पूर्व नियोजित कट रचल्याप्रमाणे अर्शद यांना पकडून ठेवले. आरोपी शेख सोहील याने आपल्या हातातील लोखंडी ‘फायटर’ने शेख अर्शद यांच्या मानेवर आणि हातावर सपासप वार केले. भरबाजारात झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते. जखमी अर्शद यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी शेख सोहील शेख खलील, शेख शोयब शेख खलील आणि मजुरुददीन जियाउददीन यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५, ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार राजेश हिवाळे हे करीत आहेत.