नांदुऱ्यात चोरट्यांचा थरार: वडाळीत घरफोडी करून ६५ हजारांचा ऐवज लंपास; बुलढाणा जिल्हा गुन्हेगारांचे नंदनवन बनतोय का?

अजय टप

नांदुरा (प्रतिनिधी): बुलढाणा जिल्ह्यात कायद्याचा धाक उरला आहे की नाही, असा संतप्त सवाल आता सर्वसामान्यांमधून विचारला जात आहे. नांदुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या वडाळी गावात काल मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत एका शेतकऱ्याच्या कष्टाची कमाई आणि सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. जिल्ह्यातील वाढत्या घरफोड्या आणि गुन्हेगारांचे वाढलेले धाडस पाहता, पोलीस प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवण्यात व्यस्त आहे का?, असा सडेतोड सवाल आता उपस्थित होत आहे.

वडाळी येथील रहिवासी आणि पेशाने शेतकरी असलेले लक्ष्मण श्रीराम वक्टे (वय ५८ वर्षे) हे आपल्या कुटुंबासह राहतात. १६ एप्रिलच्या रात्री ११.१५ ते १७ एप्रिलच्या पहाटे २.५० वाजेच्या सुमारास, जेव्हा संपूर्ण गाव गाढ झोपेत होते, तेव्हा दबा धरून बसलेल्या अज्ञात चोरट्यांनी वक्टे यांच्या घराला लक्ष केले. चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटाचे लॉकर अत्यंत चलाखीने उघडून त्यातील वंदना वक्टे यांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. यामध्ये १० ग्रॅम वजनाची सोन्याची गवली पोत. १० ग्रॅम वजनाची सोन्याची एकदाणी. ६ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या साखळ्या आणि नगदी १० हजार रुपये रोख होते. विशेष म्हणजे, ही किंमत जुन्या सरकारी दरानुसार लावण्यात आली असली, तरी आजच्या बाजारभावानुसार हा आकडा लाखांच्या घरात जातो. कष्टकरी शेतकऱ्याच्या घरातील दागिन्यांवर डल्ला मारून चोरट्यांनी पोलिसांना उघड आव्हान दिले आहे.

तपास अधिकाऱ्यांची फौज, पण गुन्हेगार मोकाट!

या घटनेची माहिती मिळताच फिर्यादी लक्ष्मण वक्टे यांनी नांदुरा पोलीस स्टेशन गाठून दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१ (४) आणि ३०५(a) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. परंतु, प्रश्न असा उरतो की, प्रत्येक वेळी गुन्हा घडल्यानंतर फक्त गुन्हे दाखल होणार की गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या जाणार?

बुलढाणा जिल्हा: गुन्हेगारीचा नवा ‘हॉटस्पॉट’?

गेल्या काही महिन्यांपासून बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागात घरफोडी, चोरी आणि लुटमारीच्या घटनांनी उच्चांक गाठला आहे. पोलीस स्टेशनच्या डायरीत ‘नाईट पेट्रोलिंग’चे रकाने भरले जातात, पण प्रत्यक्षात चोरटे गावोगावी धुमाकूळ घालत आहेत. वडाळीसारख्या गावात मध्यरात्री कुलूप तोडले जाते आणि पोलिसांना याचा सुगावा लागत नाही, हे नवलच! अस्मानी आणि सुलतानी संकटाने पिचलेला शेतकरी आता चोरट्यांच्या निशाण्यावर आहे. दिवसभर शेतात राबून आणि संसाराची पुंजी साठवून ठेवलेले दागिने एका रात्रीत गायब होतात, तेव्हा त्या कुटुंबावर काय ओढवत असेल, याची जाणीव प्रशासनाला आहे का?, ग्रामीण भागात सुरक्षेच्या उपाययोजना शून्य आहेत. गुन्हेगार याचाच फायदा घेत आहेत. पोलिसांचा खबऱ्यांचा जाळे पूर्णपणे कोलमडल्याचे या घटनांवरून स्पष्ट दिसते.

आता तरी ‘खाकी’चा धाक निर्माण होणार का?

नांदुरा परिसरात अवैध धंदे, वाळू तस्करी आणि आता घरफोड्यांचे सत्र यामुळे सर्वसामान्य नागरिक भयभीत आहेत. वडाळी येथील या चोरीमुळे गावकरी संतप्त झाले असून, लवकरात लवकर आरोपींना अटक न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे. चला तर मग पाहूया, ‘खाकी’ आपली चमक दाखवते की चोरटे पुन्हा एकदा पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होतात!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!