नांदुऱ्यात रक्ताचा सडा: प्रेमसंबंधांच्या कटू अखेर आणि इन्स्टाग्राम वॉर; वडिलांसमोरच तरुणावर दगडफेक; आरोपींचा भररस्त्यात थरार

अजय टप

नांदुरा,(प्रतिनिधी): आधुनिक युगात सोशल मीडिया हे संवादाचे साधन राहिले नसून ते संघर्षाचे रणांगण बनत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरात १५ एप्रिल रोजी घडलेल्या एका घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. एका २२ वर्षीय मजुरी करणाऱ्या तरुणाला केवळ ‘इन्स्टाग्राम स्टोरी’ ठेवल्याच्या कारणावरून आणि जुन्या प्रेमसंबंधांच्या वादातून रक्ताने माखले जाईपर्यंत मारहाण करण्यात आली. विशेष म्हणजे, मुलाची बाजू सावरण्यासाठी गेलेल्या वडिलांच्या डोळ्यांदेखत हा रक्तरंजित खेळ खेळला गेला.

नांदुरा येथील नालंदा नगर भागात राहणारा २२ वर्षीय ऋतिक संजय बिराडे हा तरुण मजुरी करून आपले कुटुंब चालवतो. तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, ऋतिकचे आरोपी सक्षम याच्या बहिणीसोबत गेल्या पाच महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. तरुण वयातील हे आकर्षण कालांतराने दोन्ही कुटुंबांच्या निदर्शनास आले. दोन्ही कुटुंबांनी सामाजिक प्रतिष्ठा आणि भविष्य लक्षात घेऊन मुला-मुलीची समजूत घातली. यानंतर त्यांच्यातील प्रेमसंबंध संपुष्टात आले होते, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. मात्र, मनातील राग आणि द्वेषाची ठिणगी आरोपींच्या मनात धगधगत होती, जिचा स्फोट बुधवार १५ एप्रिलच्या दुपारी ३.३० च्या सुमारास झाला. ऋतिक नेहमीप्रमाणे ‘पुनम कलेक्शन’ या कपड्याच्या दुकानावर काम करत होता. दरम्यान, त्याला आरोपी सक्षम याचा फोन आला. फोन उचलल्याबरोबर सक्षमने ऋतिकला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. “तू इन्स्टाग्रामवर स्टोरी का ठेवलीस?” असा जाब त्याने विचारला. त्यावर ऋतिकने उत्तर दिले की, “ती माझी वैयक्तिक स्टोरी आहे, मी ती माझ्या प्रोफाईलवर ठेवली आहे.” हा संवाद वादाच्या वळणावर गेला आणि सक्षमने त्याला प्रत्यक्ष भेटायला बोलावले.

हा वाद विकोपाला जाऊ नये म्हणून ऋतिकने आपल्या वडिलांना सर्व हकीकत सांगितली. वडील संजय बिराडे यांनी मध्यस्थी करण्याचे ठरवले. बाप-लेक दोघेही डॉ. मानकर हॉस्पिटलसमोरील संचेती ले-आऊट भागात पोहोचले. तिथे आरोपी सक्षम आधीच दबा धरून बसला होता.

ऋतिकचे वडील अतिशय संयमाने सक्षमची समजूत काढत होते. “बाबा, जे झाले ते झाले, आता त्यांच्यात काही संबंध नाही. तो मोबाईल त्याचा आहे आणि त्याने ठेवलेली स्टोरी हा त्याचा प्रश्न आहे,” असे वडील सांगत असतानाच सक्षमच्या डोक्यात रागाचे भूत संचारले. त्याने कसलाही विचार न करता जमिनीवर पडलेला एक मोठा दगड उचलला आणि थेट ऋतिकच्या डोक्यावर प्रहार केला. त्यामुळे ऋतिकच्या डोक्यातून रक्ताची धार वाहू लागली. तो सावरण्याआधीच सक्षमने पुन्हा त्याच्या डाव्या खांद्यावर आणि डाव्या हातावर दगडाने भीषण मारहाण केली. यावेळी घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती, पण मदतीला कोणीही पुढे आले नाही. तितक्यात आरोपी रणवीर वानखडे आणि त्याचे इतर दोन मित्र तिथे पोहोचले. या तिघांनी मिळून ऋतिकला गचांडी पकडून ठेवली. तर सक्षमने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. ऋतिक रक्ताने माखलेला असताना आणि त्याचे वडील गयावया करत असतानाही आरोपींचा राग शांत झाला नव्हता. “जर पुन्हा माझ्या नादी लागला किंवा आमच्या वाट्याला गेला, तर तुला जिवंत सोडणार नाही,” अशी जीवे मारण्याची धमकी देखील सक्षमने दिली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले.

याप्रकरणी ऋतिक बिराडे याने नांदुरा पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ (१), ११५ (२), ३५२, ३५१ (२)(३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार सय्यद मोहिद्दीन हे करीत आहेत.

सामाजिक विश्लेषणाची गरज

नांदुऱ्यातील ही घटना केवळ एका हाणामारीची घटना नाही, तर ती आजच्या तरुणाईमधील वाढत्या आक्रमकतेचे प्रतीक आहे. सोशल मीडियावरील किरकोळ पोस्टवरून किंवा ‘स्टेटस’वरून तरुण एकमेकांचे जीव घ्यायला उठत आहेत. प्रेमभंग आणि घरगुती वादाचे पर्यवसान जेव्हा अशा गुन्हेगारीत होते, तेव्हा दोन कुटुंबांची शांतता कायमची हिरावली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!