अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): मलकापूर शहरात महिलांवरील अत्याचाराचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. शहरात गेल्या ४८ तासांतील महिला अत्याचाराची ही दुसरी घटना समोर आल्याने खळबळ उडाली असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. चारित्र्यावर संशय घेऊन आणि ‘वांझोटी’ असल्याचे हिणवत एका २८ वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी पतीसह सासरच्या ७ जणांविरुद्ध हुंडाबळी आणि छळाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी ज्योती भगवान कुवारे (वय २८ वर्षे) रा. चिखलगाव, ता. जि. अकोला, (ह.मु. अनुराबाद, ता. मलकापूर) यांचा विवाह १५ फेब्रुवारी २०२१ रोजी भगवान रघुनाथ कुवारे यांच्याशी झाला होता. लग्नानंतर काही काळ ठीक गेल्यानंतर, पती आणि सासरच्या मंडळींनी ज्योती यांच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. दोन वर्षे उलटूनही अपत्य होत नसल्याचे कारण पुढे करून सासरच्यांनी पीडितेचे जगणे कठीण केले होते. दरम्यान, पीडितेने आपल्या सासरच्यांना विनंती केली की, “जिगाव धरणात शेत गेल्यामुळे आपल्याकडे पैसे आले आहेत, तर माझ्यावर उपचार करा, जेणेकरून आपल्याला अपत्य होईल.” यावर सासरच्यांनी माणुसकीला काळिमा फासणारे उत्तर दिले. “ते पैसे तुझ्यासाठी नाहीत, तुझ्या आईने लग्नात हुंडा दिला नाही, आता माहेरून १ लाख रुपये घेऊन ये, तरच तुझा इलाज करू, नाहीतर वांझोटीच राहा,” असे म्हणत तिचा छळ सुरू ठेवला.
सासरच्यांच्या सततच्या जाचाला आणि मानसिक त्रासाला कंटाळून पीडिता गेल्या एक वर्षापासून आपल्या माहेरी राहत आहे. या काळात पती किंवा सासरच्या इतर कोणत्याही व्यक्तीने तिची विचारपूस केली नाही किंवा तिला नांदवायला नेण्यासाठी कोणताही प्रयत्न केला नाही. अखेर, सहनशक्तीचा अंत झाल्याने ज्योती कुवारे यांनी मलकापूर शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी भगवान रघुनाथ कुवारे (पती), रघुनाथ विश्वनाथ कुवारे (सासरे), शोभाबाई रघुनाथ कुवारे (सासू), दुर्गेश रघुनाथ कुवारे (दीर), परशुराम रघुनाथ कुवारे (दीर), महादेव रघुनाथ कुवारे (दीर), शारदा विलास चव्हाण (नणंद) हिच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ४९८(अ), ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार रामचंद्र भोपळे हे करत आहेत. मलकापूर शहरात एकापाठोपाठ एक घडणाऱ्या या घटनांमुळे संताप व्यक्त होत आहे. “हुंड्यासाठी आणि अपत्य होत नाही म्हणून महिलेला छळणे हा कायद्याने गुन्हा असून, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी,” अशी मागणी होत आहे.
दिराची वाकडी नजर आणि पतीची मारहाण
या छळाची सीमा इथेच संपली नाही. पीडितेचा दीर महादेव रघुनाथ कुवारे याची नजर पीडितेवर वाईट होती. या गंभीर प्रकाराबाबत पीडितेने पती, सासू आणि सासऱ्यांकडे तक्रार केली असता, तिला न्याय मिळण्याऐवजी उलट शिवीगाळ आणि धमक्या देण्यात आल्या. पती भगवान कुवारे हा आपल्या कुटुंबीयांच्या सांगण्यावरून पीडितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला सातत्याने मारहाण करत होता.