अजय टप
मलकापूर,(बुलढाणा): माणसाच्या आयुष्यात यश-अपयशाचे अनेक टप्पे येतात, पण कधीकधी मनात दाटलेली भीती विवेकावर मात करते. अशीच एक हृदयद्रावक घटना मलकापूर शहरातील आकारेश्वर नगर परिसरात घडली आहे. उद्या लागणाऱ्या बारावीच्या निकालाच्या धास्तीने एका १९ वर्षीय तरुणाने निकालाच्या आदल्या दिवशीच मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृतक साहिल संजय राणे (वय १९ वर्षे) हा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा (बारावी) विद्यार्थी होता. आज शनिवारी, २ मे २०२६ रोजी बारावीचा निकाल जाहीर होणार होता. गेल्या काही दिवसांपासून साहिल निकालाच्या निकालाबाबत प्रचंड तणावात होता. “निकाल कसा लागेल? अपेक्षेप्रमाणे गुण मिळतील का?” या एकाच विचाराने त्याला ग्रासले होते. हीच भीती अखेर इतकी टोकाला गेली की, त्याने स्वतःचे जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. शुक्रवारी (१ मे) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास, जेव्हा घरचे लोक कामात होते, तेव्हा साहिलने आपल्या बेडरुममधील पंख्याला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला. या घटनेनंतर राजेंद्र राणे यांनी तातडीने मलकापूर शहर पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी मर्ग दाखल करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय बरदाडे हे करत आहेत.
वडिलांचा टाहो आणि काकांचा धावपळ
या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच परिसरात शोककळा पसरली. साहिलचे वडील संजय भास्कर राणे यांनी आपल्या मुलाला खोलीत लटकलेल्या अवस्थेत पाहताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी तातडीने साहिलचे काका, राजेंद्र भास्कर राणे (शिक्षक) यांना फोन करून घटनेची माहिती दिली. काका राजेंद्र राणे यांनी तातडीने आकारेश्वर नगर येथील घराकडे धाव घेतली. तिथे पोहोचल्यावर त्यांनी पाहिले की, त्यांच्या भावाने साहिलला फासावरून खाली उतरवले होते. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. साहिलचे शरीर थंड पडले होते आणि त्याचा श्वास कायमचा थांबला होता. एका हसत्या-खेळत्या मुलाचा असा करुण अंत पाहून राणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
निकालाचा कागद आयुष्य ठरवू शकत नाही
साहिलच्या निधनाने केवळ एक कुटुंब उद्ध्वस्त झाले नाही, तर समाजासमोर पुन्हा एकदा मुलांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न उभा राहिला आहे. बारावीचा निकाल म्हणजे आयुष्याचा शेवट नसतो, हे पटवून देण्यात आपण कुठेतरी कमी पडतोय का? असा प्रश्न आज प्रत्येक पालक आणि शिक्षकाला पडत आहे. निकाल केवळ गुणांचा असतो, आयुष्याचा नाही. अपयशाच्या भीतीने टोकाचे पाऊल उचलणे हा उपाय नाही. संवाद साधा, मन मोकळे करा, पण जीवन संपवू नका,” असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. आज जेव्हा निकालाची घोषणा होईल, तेव्हा साहिलचे नाव त्या यादीत असेल, पण साहिल स्वतः हे यश पाहायला जिवंत नसेल. एका कळीचा उमलण्यापूर्वीच झालेला असा अंत समाजाला विचार करायला लावणारा आहे.
