‘ऑपरेशन प्रहार’चा धडाका: अकोला स्थानिक गुन्हे शाखेकडून गावठी पिस्तूल तस्करीचा पर्दाफाश; तिघे गजाआड!

पुष्पक मानकर

अकोला,(प्रतिनिधी): गुन्हेगारीच्या मुळावर घाव घालण्यासाठी अकोला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी पुकारलेल्या ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने दोन वेगवेगळ्या कारवायांत मोठी यश संपादन केले आहे. मध्यप्रदेशातून तस्करी करून आणलेली दोन घातक देशी बनावटीची पिस्तूलं आणि दोन जिवंत काडतुसांसह पोलिसांनी तीन अट्टल आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या धडक कारवाईमुळे अवैध शस्त्र विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून पोलिसांनी एकूण २ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अकोला जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रे आणि एनडीपीएस (अंमली पदार्थ) विरोधात कडक पावले उचलण्यासाठी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी १५ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. याच मोहिमेचा भाग म्हणून गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यात सक्रिय झाले होते. ३० एप्रिल २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेला खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली की, मध्यप्रदेशातील पाचुरी गावातून दोन इसम एका विना क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या दुचाकीवरून अग्निशस्त्रे विक्रीसाठी नेर फाटा मार्गे अकोला जिल्ह्यात येणार आहेत. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी तातडीने पथक तैनात केले. अकोट तालुक्यातील नेर फाटा परिसरात पोलिसांनी सापळा रचला. यावेळी संशयास्पद दुचाकी येताच पोलिसांनी दत्ता महादेव मोहोड (वय २५ वर्षे) रा. उमरी, ता.तेल्हारा, अक्षय संतोष मोहोड (वय २४ वर्षे) रा. नवी उमरी, ता. तेल्हारा यांच्यावर झडप घालून त्यांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता, अक्षय मोहोडच्या कमरेला मॅगझिनसह एक लोखंडी देशी बनावटीचे पिस्तूल (किंमत ४० हजार रुपये) आढळून आले, तर दत्ता मोहोडच्या खिशात एक जिवंत काडतूस (किंमत १ हजार रुपये) सापडले. शस्त्रांबाबत कोणताही परवाना नसल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी त्यांना जागेवरच अटक केली. अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३, २५ अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी त्यांना दहीहंडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

तिसऱ्या आरोपीलाही ठोकल्या बेड्या

पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी दत्ता मोहोड याने कबुली दिली की, सात-आठ दिवसांपूर्वीच त्यांनी एक अग्निशस्त्र आणि जिवंत काडतूस शेख अकबर शेख हारूण (रा. पातुर्डा, जि. बुलडाणा) याला विकले आहे. शस्त्राची विल्हेवाट लागण्यापूर्वीच पोलिसांनी तातडीने बुलडाणा जिल्ह्यातील पातुर्डा येथे धाड टाकली आणि शेख अकबर याला अटक केली. त्याच्याकडून ४१ हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले.

अकोला पोलीस दलाचे यश

सदर कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी.चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेळके, सपोनि विजय जाधव, पोउपनि माजीद पठाण आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. अकोला पोलिसांच्या या आक्रमक कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून ‘ऑपरेशन प्रहार’चा धडाका पुढील काळातही असाच सुरू राहणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!