स्थानिक गुन्हे शाखेची ‘सिनेस्टाईल’ थरारक कारवाई; जालना सीमेवर ५ दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या; रत्न विक्रीच्या बहाण्याने फसवणूक करून लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ४.८० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

बुलढाणा,(प्रतिनिधी): बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखा आणि अंढेरा पोलिसांनी संयुक्तरीत्या अत्यंत धाडसी कारवाई करत, जालना जिल्ह्याच्या सीमेवर सिनेस्टाईल पाठलाग करून ५ अट्टल दरोडेखोरांना बेड्या ठोकल्या आहेत. रत्न विक्रीच्या बहाण्याने बोलावून एका व्यापाऱ्याला बेदम मारहाण करत लुटणाऱ्या या टोळीला अवघ्या २४ तासांच्या आत गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे.

नांदेड जिल्ह्यातील वसरणी (शंकरनगर) येथील रहिवासी चंद्रशेखर गुंडय्या स्वामी (वय ३२ वर्षे) यांना आरोपींनी जाळ्यात ओढले. आरोपी निलेश नरेश भोसले आणि जॅकीचंद विरोधभाई पवार यांनी स्वामी यांना ‘सुलेमानी हकीक’ नावाच्या मौल्यवान रत्नाचा व्हिडिओ पाठवला आणि तो विकायचा असल्याचे आमिष दाखवले. या रत्नाच्या खरेदीसाठी स्वामी यांना चिखली ते देऊळगाव राजा रोडवरील ‘राजवाडा’ परिसरात बोलावण्यात आले. दिनांक १ मे २०२६ रोजी दुपारी ४ ते ५ वाजेच्या सुमारास स्वामी तेथे पोहोचले असता, दबा धरून बसलेल्या निलेश भोसले, जॅकीचंद पवार, आदित्य भोसले, राज पवार, भाऊराजा पवार आणि त्यांच्या एका साथीदाराने स्वामी यांना घेरले. आरोपींनी त्यांना काठ्यांनी आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. स्वामी यांच्या जवळील सोने, चांदी, अष्टधातूचे दागिने आणि २० हजार रुपयांची रोख रोकड, असा एकूण ४ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल आरोपींनी जबरीने चोरून नेला आणि घटनास्थळावरून पोबारा केला.

या घटनेनंतर अंढेरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१०(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर आणि अंढेरा पोलीस स्टेशनचे सपोनि रुपेश शक्करगे यांनी विशेष पथके तयार केली. तपासादरम्यान गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, मुख्य आरोपी निलेश भोसले हा साकेगाव येथे आहे, तर त्याचे इतर साथीदार जालना जिल्ह्याच्या दिशेने पळून जात आहेत. या माहितीनंतर संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली.

शेतात ३ किलोमीटर धावत आवळल्या मुसक्या

पोलीस पथकाने प्रथम साकेगाव गाठून निलेश भोसलेला अटक केली. मात्र, त्याचे इतर चार साथीदार (जॅकीचंद पवार, आदित्य भोसले, राज पवार, भाऊराजा पवार) हे जालना जिल्ह्याच्या दिशेने पळ काढत होते. पोलिसांनी त्यांचा पाठलाग सोडला नाही. आरोपींनी पोलिसांना पाहून शेतात पळ काढला, मात्र पोलिसांनी तब्बल ३ किलोमीटर शेतात धावून या दरोडेखोरांना पकडले.

१०० टक्के मुद्देमाल हस्तगत

पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईत आरोपींकडून लुटलेला १०० टक्के मुद्देमाल, ज्याची किंमत ४ लाख ८० हजार रुपये आहे, तो हस्तगत केला आहे. यामध्ये सोने: १४ ग्रॅमच्या २ सोन्याच्या अंगठ्या (२.८० लाख रु.) आणि ५ ग्रॅमचे सोन्याचे कुंडल (७० हजार रु.). चांदी: ४०० ग्रॅमचे कडे (१ लाख रु.), २ तोळे ब्रासलेट (५ हजार रु.), ४० ग्रॅमच्या बेड्या (१० हजार रु.), चांदीची अंगठी, राखी आणि चैन. इतर: १०० ग्रॅमची अष्टधातूची गदा आणि ११ हजार रुपयांची नगदी रोख, या वस्तूंचा समावेश आहे.

यांनी केली ही यशस्वी कारवाई

ही धडाकेबाज कामगिरी पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा (खामगाव), अमोल गायकवाड (बुलढाणा), आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि सुनील अंबुलकर, सपोनि रुपेश शक्करगे, पीएसआय प्रताप बाजड, पीएसआय दिनेश घुगे यांच्यासह दिगंबर कपाटे, शरद गिरी, पुरुषोत्तम आघाव, वनिता शिंगणे, मनोज खरडे, अमोल अंभोरे, पूजा जाधव, विकास देशमुख, सिद्धार्थ सोनकांबळे, भरत पोफळे, किशोर जाधव, श्रीकांत पव्हरे आणि तांत्रिक विश्लेषण विभागाचे राजू आडवे यांनी पार पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!