साहेब बदलले, पण पाटी हटेना! बुलढाण्याच्या जिल्हाधिकारी बंगल्यावर ‘भूतपूर्व’ प्रेमाचा ओलावा?

बुलढाणा,(प्रतिनिधी): सरकारी खुर्ची आणि बंगल्याचा मोह सुटता सुटत नाही, असं म्हणतात. पण बुलढाण्यात काहीसं वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. जिल्हाधिकारी बदलले, नवे साहेब रुजू झाले, प्रशासकीय गाडा धावू लागला; मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आजही ‘भूतपूर्व’ जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाची पाटी डौलाने मिरवत आहे. हे पाहून येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या मनात एकच प्रश्न येतोय, तो म्हणजे “नेमकं कोणाचं नाव कोरायचं राहिलंय की कोणाचं काढायचं राहिलंय?

बुलढाण्याचे माजी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची बदली होऊन आता बराच काळ लोटला आहे. नियमानुसार, जेव्हा एखादा मोठा अधिकारी पदमुक्त होतो, तेव्हा त्यांच्या बंगल्याबाहेरील नावाची पाटी तातडीने बदलली जाते किंवा किमान त्यावर पडदा तरी टाकला जातो. मात्र, बुलढाण्यातील जिल्हाधिकारी बंगल्याच्या भिंतीला आणि त्या लोखंडी स्टँडला बहुधा डॉ. पाटील यांच्या नावाचा लळा लागलेला दिसतोय.

जिल्ह्यात नवे जिल्हाधिकारी प्रवीणकुमार देवरे रुजू होऊन त्यांनी आपल्या कामाचा धडाकाही सुरू केला आहे. पण बंगल्याच्या गेटवर मात्र अजूनही ‘डॉ. किरण पाटील, भा.प्र.से.’ अशीच अक्षरे झळकत आहेत. हे पाहून एखादा अनोळखी माणूस कामासाठी आला, तर त्याला आपण चुकीच्या ठिकाणी तर आलो नाही ना, असा भास झाल्याशिवाय राहत नाही.

पाटी आहे की ‘पत्ता’ शोधायचं साधन?

एकीकडे प्रशासन ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘गतिमान प्रशासन’च्या गप्पा मारत असताना, जिल्हाधिकाऱ्यांच्या घराबाहेरील साधी पाटी बदलायला मुहूर्त सापडत नसल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहेत. काही खोडकर नागरिक तर असंही म्हणत आहेत की, “कदाचित सार्वजनिक बांधकाम विभागाला पेंटर सापडत नसावा किंवा मग नव्या साहेबांना स्वतःच्या नावापेक्षा जुन्या नावाच्या वलयात राहण्यात जास्त रस असावा!” विशेष म्हणजे, या पाटीच्या आजूबाजूला सुरक्षा रक्षक असतात, कर्मचारी असतात आणि खुद्द जिल्हाधिकारी याच गेटमधून ये-जा करतात. तरीही ही ‘एक्स्पायरी डेट’ संपलेली पाटी कोणाच्याही नजरेत कशी पडत नाही, हे एक प्रशासकीय कोडेच बनले आहे.

अतिथी देवो भव… पण कोणाकडे?

समजा, एखादा नवीन पाहुणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आला आणि तो या पाटीकडे पाहून घरात शिरला, तर त्याला आत दुसरेच साहेब भेटतील. अशा वेळी होणारा गोंधळ हा केवळ विनोदी नसून प्रशासकीय शिस्तीला काळिमा फासणारा ठरतो. “साहब तो चले गये, पर यादें छोड गये,” अशी मिश्किल टिप्पणी सध्या जिल्हा कचेरीत ऐकायला मिळत आहे.

आता तरी ‘कलर’ लागणार का?

नेहमी इतरांना शिस्त लावणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयाने आपल्याच घराच्या अंगणात डोकावून बघण्याची गरज आहे. नावाची पाटी ही केवळ लोखंडाचा तुकडा नसते, तर ती त्या पदाची आणि त्या व्यक्तीची ओळख असते. जेव्हा पद बदलतं, तेव्हा ओळखही बदलायला हवी. आता या बातमीमुळे तरी प्रशासनाला जाग येईल का? की ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवून “पाटी आहे तर आहे, तुमचं काय जातंय?” अशी भूमिका घेतली जाईल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. तोपर्यंत, बुलढाणेकर मात्र या ‘भूतपूर्व’ पाटीकडे बघून “साहेब, पाटी बदला हो…” असंच म्हणत राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!