मोताळा, (प्रतिनिधी): बुलढाणा जिल्ह्यातील बोराखेडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या तरवाडी (ता.नांदुरा) येथे चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. अज्ञात आरोपींनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि मोटारसायकल असा एकूण १ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तरवाडी येथील रहिवासी असलेले गजानन अशोक कुटे (वय ३५ वर्षे) हे दि. १ मे २०२६ च्या रात्री ११.३० ते २ मे २०२६ च्या पहाटे ३.३० वाजेदरम्यान, आपल्या कुटुंबासमवेत गाढ झोपेत असताना संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराला लक्ष्य केले. चोरट्यांनी गजानन कुटे आणि त्यांच्या भावाच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील सामानाची उचकापाचक करत कपाटात ठेवलेले ९० हजार रुपये रोख आणि दुसऱ्या कपाटातील ३० हजार रुपये रोख, असे एकूण १ लाख २० हजार रुपये रोख लंपास केले. एवढेच नव्हे तर, अंदाजे १ हजार २०० रुपये किमतीचे सोन्याचे कुरडू आणि अंगणातून अंदाजे ६० हजार रुपये किमतीची होंडा शाईन मोटारसायकल, असा एकूण १ lakh ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले. घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी २ मे रोजी सकाळी ९.३० वाजता घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. बुलढाणा येथून श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. याप्रकरणी गजानन कुटे यांच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांत अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या कलम ३०५, ३३१(४) आणि ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार सुपडासिंग चव्हाण हे करत आहेत.
परिसरात चिंतेचे वातावरण
शेतकरी कुटुंबाने कष्टाने कमावलेले कपाशीचे पैसे आणि दागिने चोरीला गेल्यामुळे कुटे कुटुंब मोठ्या संकटात सापडले आहे. तरवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची चर्चा असून, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. चोरट्यांनी मोटारसायकलसह पळ काढल्यामुळे हे सराईत गुन्हेगार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
