खामगाव,(प्रतिनिधी): कायद्याचा धाक संपला की विकृती डोके वर काढते, याचा विषण्ण करणारा प्रत्यय खामगाव तालुक्यातील नागझरी खुर्द येथे आला आहे. केवळ उधारीच्या पैशांच्या वादातून एका हिंसक टोळक्याने मध्यरात्रीच्या सुमारास एका गरिबाच्या घरावर जो हल्ला चढवला, त्याने केवळ एक कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण माणुसकीच रक्तबंबाळ झाली आहे. या हल्ल्यात केवळ पुरुषांनाच मारहाण झाली नाही, तर एका अबलेची भरचौकात विटंबना करून तिच्या अस्मितेवर घाला घालण्यात आला. ही घटना केवळ दोन गटांतील वाद नसून, ग्रामीण भागात फोफावत चाललेल्या ‘गुंडशाही’चे जळजळीत वास्तव आहे.
घटनेची सुरुवात तशी किरकोळ वादातून झाली. सायंकाळी सातच्या सुमारास ‘उधारीचे पैसे का देत नाही?’ यावरून एका तरुणाला सार्वजनिक ठिकाणी अपमानित करण्यात आले. त्याला तिथेच चापटबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. सामान्यतः असा वाद तिथेच संपायला हवा होता, परंतु त्या तरुणाच्या शांत स्वभावाला आरोपींनी त्याची हतबलता समजण्याची चूक केली. रात्री आठ वाजता पुन्हा त्या तरुणाच्या घरात शिरून त्याला मारहाण करण्यात आली. मात्र, नराधमांच्या हिंसेची भूक एवढ्यावर भागली नव्हती.
साडेनऊच्या सुमारास. जेव्हा संपूर्ण गाव शांत होण्याच्या तयारीत होते, तेव्हा हातात लोखंडी पाईप, लाकडी काठ्या आणि डोळ्यात सूडाची भावना घेऊन हे टोळके फिर्यादीच्या घरासमोर धडकले. बेकायदेशीर मंडळी जमवून एखाद्या युद्धभूमीप्रमाणे या टोळक्याने एका सामान्य मजुराच्या घरावर आक्रमण केले. या संपूर्ण घटनेतील सर्वात चीड आणणारी बाब म्हणजे महिलेसोबत केलेले अश्लाघ्य कृत्य. जेव्हा घरातील कर्त्या पुरुषांना आणि पाहुण्या म्हणून आलेल्या जावयाला हे टोळके लोखंडी पाईपने बेदम मारत होते, तेव्हा आपल्या मुलाला वाचवण्यासाठी एक हतबल आई मध्यस्थी करायला आली. मात्र, रक्ताची चटक लागलेल्या त्या लांडग्यांना वयाचे आणि नात्याचे भान राहिले नाही. त्या माऊलीला जवळ ओढून, तिची साडी खेचून आणि अंगातील ब्लाऊज फाडून तिचा विनयभंग करण्यात आला.
एका महिलेच्या पदराला हात घालणे ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला लागलेली मोठी चपराक आहे. ज्या भूमीत महिलांना आदिशक्ती मानले जाते, तिथे भरवस्तीत एका मातेची वस्त्रहरणापर्यंत मजल जाणे, हे या गुंडांच्या विकृत मानसिकतेचे दर्शन घडवते.
लोखंडी पाईपचे घाव आणि रक्ताचे सडे
आरोपींनी केवळ हात चालवले नाहीत, तर जीवघेण्या हत्यारांचा वापर केला. लाकडी काठ्या आणि लोखंडी पाईपच्या प्रहाराने फिर्यादी, त्याचे जावई आणि आई यांना अक्षरशः रक्तबंबाळ करण्यात आले. “आज तुम्हाला जिवंत ठेवणार नाही,” अशा गर्जना करत संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले गेले. मारहाणीचा हा तांडव एवढा भीषण होता की, आसपासचे नागरिकही मदतीला धावून येण्यास घाबरत होते. हा हल्ला पूर्वनियोजित होता की काय, असा संशय निर्माण होण्याइतपत आरोपींची तयारी होती.
घटनेचे गांभीर्य ओळखून हिवरखेड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संदीप आणि उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. नव्हेतर उपरोक्त आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या कलम ११५(२), ११८(१), ७४, ७५, ७६, १९१(२)(३), १९०, ३५१, ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार विलास साखरे हे करीत आहेत.
कायदा कोणासाठी?
नागझरी खुर्दची ही घटना अनेक प्रश्न उपस्थित करून जाते. एका बाजूला आपण डिजिटल इंडियाच्या बाता मारत असताना, दुसऱ्या बाजूला जातीपातीच्या आणि उधारीच्या वादातून आजही तलवारी आणि पाईप बाहेर निघत आहेत. ज्या आरोपींनी एका महिलेच्या अब्रूला हात घातला, त्यांना समाजात वावरण्याचा अधिकार आहे का?, उधारीचे पैसे वसूल करण्याचे कायदेशीर मार्ग सोडून जेव्हा कोणी स्वतःच्या हातात कायदा घेते, तेव्हा त्याचे रूपांतर अशा भीषण गुन्ह्यात होते. आज फिर्यादीचे कुटुंब भीतीखाली वावरत आहे. त्यांच्या घरातील शांतता आणि सन्मान एका रात्रीत धुळीस मिळाला आहे. पोलिसांनी जर या प्रकरणात कठोर पावले उचलली नाहीत, तर उद्या अशा गुंडांचे धाडस अधिक वाढल्याशिवाय राहणार नाही,एवढे मात्र खरे!
ग्रामस्थांमधून संताप
या घटनेनंतर नागझरी खुर्द आणि गणेशपूर परिसरातील वातावरण तणावपूर्ण आहे. बंजारा समाज आणि स्थानिक नागरिकांनी या कृत्याचा तीव्र निषेध केला असून, आरोपींना तात्काळ बेड्या ठोका आणि त्यांना कठोर शिक्षा द्या, अशी मागणी केली आहे. पीडित कुटुंबाला संरक्षण देण्याची आणि आरोपींवर तडीपारीसारखी कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. नागझरी खुर्दचा हा आक्रोश आता मंत्रालयापर्यंत पोहोचणार का? की एका गरिबाची विटंबना फाईलमध्ये दबून राहणार? हाच आता खरा प्रश्न आहे.