अभिनय बोर्डे
धाड,(प्रतिनिधी): एकीकडे निसर्गाच्या लहरीपणाशी झुंज देत शेतकरी आपले पीक उभे करतो, तर दुसरीकडे माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनांमुळे तो उद्ध्वस्त होत आहे. सावळी परिसरातून एक अत्यंत संतापजनक आणि चीड आणणारी घटना समोर आली असून, अज्ञात समाजकंटकांनी दोन शेतकऱ्यांच्या शेतातील मक्याचे पुंज (गंजी) पेटवून दिले आहेत. या भीषण आगीत तब्बल ७ ते ८ लाख रुपयांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांचे वर्षभराचे कष्ट काही मिनिटांतच राख झाले आहेत.
सावळी शिवारातील दोन वेगवेगळ्या गटांतील मक्याच्या पिकाला अज्ञातांनी लक्ष केले. गट नं. १५२ येथील रहिवासी बेबीताई देविदास जाधव यांच्या ४ एकर क्षेत्रातील मक्याचा पुंज पेटवण्यात आला. गट नं. १६१ येथील श्रीराम विठोबा वाघ यांच्याही ४ एकर क्षेत्रातील मक्याला आग लावण्यात आली. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत या नराधमांनी लावलेली आग इतकी भीषण होती की, पाहता पाहता सोन्यासारखा मका जळून कोळसा झाला. ८ एकरमधील मका म्हणजे केवळ पीक नव्हते, तर त्या कुटुंबांच्या वर्षभराच्या आशा आणि आर्थिक गणिते होती.
घटनेची माहिती मिळताच देविदास पाटील जाधव यांनी तात्काळ धाड ठाणेदार प्रताप बोस, महसूल विभागाचे आर.आय. राऊत,तलाठी लांडे आणि पोलीस पाटील प्रभाकर वाघ यांना संपर्क साधला. प्रशासनाने घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जळालेल्या पिकाची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा पूर्ण केला आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, गुन्हेगारांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
ही आग केवळ मक्याला लागलेली नाही, तर ती शेतकऱ्यांच्या काळजाला लागलेली आग आहे. कोणीतरी मुद्दामहून, पूर्ववैमनस्यातून किंवा विकृत मानसिकतेतून हे कृत्य केले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अज्ञात आरोपींचा शोध कधी लागणार?, शेतकऱ्यांच्या संरक्षणाची जबाबदारी कोणाची?, नुकसान भरपाई तातडीने मिळणार का?, असे अनेक प्रश्न आता सावळी आणि करडी परिसरातील ग्रामस्थ विचारत आहेत. पुढील तपास ठाणेदार बोस यांच्या मार्गदर्शनाखाली धाड पोलीस करीत आहेत.
सावळी येथील ही घटना संपूर्ण जिल्ह्याला सुन्न करणारी आहे. जर आज शेतकऱ्यांच्या शेतात घुसून अशा प्रकारे जाळपोळ होत असेल, तर बळीराजाने सुरक्षित कुठे राहावे? प्रशासनाने केवळ पंचनामा करून थांबू नये, तर यामागील सूत्रधारांना शोधून त्यांना अशी अद्दल घडवावी की, पुन्हा कोणाचेही असे कृत्य करण्याचे धाडस होणार नाही.