बुलढाणा,(प्रतिनिधी): पोलीस प्रशासन केवळ गुन्हेगारी रोखण्याचे काम करत नाही, तर समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करून संवेदनशील पावलेही उचलत असते. याचाच प्रत्यय २९ एप्रिल २०२६ रोजी बुलढाणा येथे आला. बुलढाणा जिल्हा पोलीस दलाच्या ‘भरोसा सेल’ अंतर्गत नव्याने उभारण्यात आलेल्या ‘हिरकणी कक्षा’चे दिमाखदार उद्घाटन अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांच्या हस्ते पार पडले. या उपक्रमामुळे पोलीस दलाच्या संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कौटुंबिक वाद किंवा इतर समस्या घेऊन ‘भरोसा सेल’मध्ये अनेक महिला आपल्या लहान बालकांसह येत असतात. अशा वेळी तासनतास सुरू असलेल्या समुपदेशनादरम्यान लहान मुलांची देखभाल करणे किंवा त्यांना स्तनपान करवणे महिलांसाठी अडचणीचे ठरत होते. ही गरज ओळखून बुलढाणा पोलिसांनी ‘हिरकणी कक्षा’ची संकल्पना अमलात आणली. या कक्षामुळे आता मातांना आपल्या बालकांना सुरक्षित वातावरणात सांभाळता येणार असून, त्यांना एक खासगी आणि हक्काची जागा उपलब्ध झाली आहे.
या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी जिल्हयातील पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची मांदियाळी जमली होती. त्यामध्ये प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, अमोल गायकवाड, पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय), बाळकृष्ण पावरा, देऊळगाव राजा उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम, बुलढाणा उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी बोलताना विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी बुलढाणा पोलीस दलाच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. पोलीस ठाणे किंवा भरोसा सेलमध्ये येणारी पीडित महिला आधीच मानसिक तणावाखाली असते. त्यात जर तिचे लहान मूल सोबत असेल, तर तिची ओढाताण अधिक होते. ‘हिरकणी कक्ष’ अशा मातांना मानसिक आधार आणि सुविधा देण्याचे काम करेल. हा केवळ एक कक्ष नसून पोलीस दलाच्या संवेदनशीलतेचे प्रतीक असल्याचे त्यांनी बोलतांना सांगितले. पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सुरू असलेल्या विविध जनहितार्थ उपक्रमांची माहिती दिली आणि भरोसा सेल अधिक सक्षम करण्यावर भर दिला.
भरोसा सेलच्या टीमचे योगदान
या अभिनव कक्षाची उभारणी आणि उद्घाटन सोहळा यशस्वी करण्यासाठी भरोसा सेलच्या प्रभारी अधिकारी पीएसआय शिल्पा सुरगडे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने अतोनात मेहनत घेतली. कक्षाची सजावट, तिथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयीसुविधा आणि कार्यक्रमाचे नेटके नियोजन यामुळे उपस्थित मान्यवरांनी संपूर्ण स्टाफचे कौतुक केले.