अजय टप
मोताळा,(प्रतिनिधी): बुलढाणा जिल्ह्यातील बोराखेडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हेगारांचे धाडस दिवसेंदिवस वाढत चालले असून, आता भरवस्तीत आणि वर्दळीच्या ठिकाणीही सामान्य नागरिक सुरक्षित राहिलेले नाहीत. मोताळा येथील ‘होय स्टेडियम’ परिसरात एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने अत्यंत शिताफीने लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, “गुन्हेगार आता इतके निर्धास्त झाले आहेत का?” असा संतप्त सवाल सर्वसामान्य जनतेतून उपस्थित होत आहे.
तारापूर (ता. मोताळा) येथील रहिवासी असलेल्या कमलाबाई ईश्वरसिंग चव्हाण (वय ७५ वर्षे) या २९ एप्रिल २०२६ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास मोताळा येथील स्टेडियम परिसरातून जात होत्या. रणरणत्या उन्हात आणि वर्दळीच्या ठिकाणी चोरट्याने आपली नजर त्यांच्यावर रोखली होती. कमलाबाईंना काही समजण्याच्या आतच, अत्यंत चपळाईने अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील तीन ग्रॅम वजनाची सोन्याची मणी व डोरले असलेली पोत (किंमत अंदाजे १८ हजर रुपये) चोरून नेली. ही चोरी इतक्या न कळतपणे केली गेली की, फिर्यादीला तात्काळ काहीच हालचाल करता आली नाही.
या घटनेत सर्वात धक्कादायक बाब म्हणजे वेळेची निवड. भरदुपारी १.३० वाजता, जेव्हा लोक रस्त्यावरून ये-जा करत असतात, अशा वेळी एका वृद्ध महिलेला लक्ष्य करणे हे गुन्हेगारांच्या वाढलेल्या आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. कायद्याचे भय संपल्यागत गुन्हेगार आता दिवसाढवळ्या गुन्ह्यांना अंजाम देत आहेत. विशेषतः वृद्ध नागरिकांना लक्ष्य करण्याच्या वाढत्या घटनांमुळे पोलिसांच्या गस्तीवर आणि गुप्तचर यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. चोरी गेलेली रक्कम किंवा सोन्याचे वजन कमी असले, तरी एका ७५ वर्षीय माऊलीच्या सुरक्षिततेचा प्रश्न मोठा आहे.
घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. फिर्यादी कमलाबाई चव्हाण यांच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास अमोल खराडे हे करीत आहेत.
पोलीस हे आव्हान पेलतील का?
मोताळा आणि परिसरातील वाढत्या चोऱ्यांच्या घटनांमुळे नागरिक भयभीत आहेत. स्टेडियमसारख्या सार्वजनिक ठिकाणी जर महिला सुरक्षित नसतील, तर मग सुरक्षित जागा उरली कुठे? गुन्हेगार इतके निर्धास्त झाले आहेत की त्यांना पकडण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे. केवळ गुन्हा दाखल करून न थांबता, या चोरट्याचा तात्काळ शोध घेऊन त्याला बेड्या ठोकणे गरजेचे आहे, जेणेकरून गुन्हेगारांमध्ये कायद्याचा वचक निर्माण होईल.