बुलढाणा जिल्हा बेपत्तांच्या घटनांनी हादरला; चिखली, बोराखेडी आणि शेगावमधून तिघे बेपत्ता

अजय टप

बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून नागरिक बेपत्ता होण्याच्या सत्रात मोठी वाढ झाली असून, यामुळे पालकांमध्ये आणि सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. अवघ्या काही दिवसांच्या अंतरात चिखली, बोराखेडी (आडविहीर) आणि शेगाव येथून दोन तरुण मुली आणि एका विवाहित पुरुषाचा शोध लागेनासा झाला आहे. या संदर्भात संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल करण्यात आल्या आहे.

चिखली: स्वामी समर्थ केंद्रात आरतीला गेलेली १८ वर्षीय दिव्या बेपत्ता

चिखली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पंचमुखी महादेव मंदिर परिसरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिव्या सुनील जाधव (वय १८ वर्षे ६ महिने) ही तरुणी ३ मे २०२६ रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घराशेजारील स्वामी समर्थ केंद्रामध्ये आरती करण्यासाठी गेली होती. मात्र, आरतीची वेळ टळूनही ती घरी परतली नाही. या संदर्भात मिसिंग दाखल करण्यात आली आहे. लक्ष्मीची उंची ५ फूट, रंग गोरा, बांधा पातळ. अंगात नेव्ही ब्लू रंगाचा टॉप आणि काळ्या रंगाची लेगीज आहे. तिचे केस लांब असून पायात स्लीपर आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस अंमलदार सूर्यकला मस्के ह्या करत आहेत.

बोराखेडी: काकांकडे जाते म्हणणारी १९ वर्षीय श्रृती बेपत्ता

दुसरी घटना मोताळा तालुक्यातील आडविहीर येथे घडली आहे. श्रृती रामदास वानखेडे (वय १९ वर्षे) ही तरुणी ६ मे २०२६ रोजी सकाळच्या सुमारास बेपत्ता झाली. घटनेच्या वेळी तिचे आई-वडील घरी नव्हते. तिने शेजाऱ्यांना मी मलकापूरला काकांकडे जात आहे, असे सांगितले आणि ती घरातून निघाली. मात्र, ती मलकापूरला पोहोचलीच नाही. तिचा रंग सावळा, उंची ५ फूट असून तिने अंगात पंजाबी ड्रेस घातलेला असून पायात लेडीज चप्पल आणि सोबत काळ्या रंगाची शालेय बॅग आहे. वडील रामदास पांडुरंग वानखेडे यांच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी मिसिंग दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार प्रमोद साळोख हे करत आहेत.

शेगाव: मानसिक तणावातून ठेकेदार तरुण बेपत्ता

शेगाव शहरातील पंचायत समितीजवळील स्वयंभू नगर येथील रहिवासी गोकुळ रमेश तेल्हारकर (वय ३५ वर्षे) हा विवाहित तरुण १६ एप्रिल २०२६ पासून बेपत्ता आहे. गोकुळ व्यवसायाने ठेकेदार असून, कौटुंबिक कारणास्तव (पत्नी माहेरी राहत असल्याने) तो गेल्या काही काळापासून मानसिक तणावात होता.

१६ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घरातील सर्व सदस्य झोपलेले असताना गोकुळ कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेला. त्याचा मोबाईलही बंद असल्याने संपर्क करणे कठीण झाले आहे. निवृत्त कर्मचारी असलेले त्याचे वडील रमेश बाळकृष्ण तेल्हारकर यांनी शेगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्याचा रंग गोरा, मजबूत बांधा, उंची ५ फूट ६ इंच, केस काळे आणि वाढलेली दाढी असून त्याने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि पॅन्ट घातलेली आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार सुनील सुसर हे करत आहेत.

पालकांमध्ये चिंतेचे सावट

जिल्ह्यात अचानक वाढलेल्या या बेपत्ता होण्याच्या घटनांमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. विशेषतः तरुण मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढल्याने पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. चिखलीतील दिव्या, बोराखेडीतील श्रृती आणि शेगावचा गोकुळ यांचा अद्याप शोध लागलेला नाही. वरीलपैकी कोणत्याही व्यक्तीबाबत काहीही माहिती मिळाल्यास तातडीने संबंधित पोलीस स्टेशन सोबत संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!