अजय टप
बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): गेल्या काही दिवसांत बुलढाणा जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांतून नागरिक, विशेषतः तरुण पिढी आणि वृद्ध व्यक्ती अचानक बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. मे २०२६ च्या या रखरखत्या उन्हाळ्यात कौटुंबिक मानसिक ताणतणाव, संवादहीनता किंवा इतर अज्ञात कारणांमुळे घर सोडून जाण्याचे प्रमाण वाढल्याचे चित्र समोर येत आहे. नुकत्याच समोर आलेल्या तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये दोन तरुण मुली आणि एका अतिवृद्ध महिलेचा समावेश असून, संबंधित पोलीस ठाण्यांनी या प्रकरणी मिसिंग दाखल केली आहे. या वाढत्या प्रवृत्तीमुळे संपूर्ण जिल्ह्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. सध्याच्या डिजिटल आणि गुंतागुंतीच्या युगात तरुण मुलींचे बेपत्ता होणे अत्यंत संवेदनशील मानले जाते.
किणगाव राजा: पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंदखेड राजा तालुक्यात येणाऱ्या एका ग्रामीण भागातून एक २० वर्षीय तरुणी अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उपलब्ध प्राथमिक माहितीनुसार, सदर तरुणी १९ मे २०२६ रोजी दुपारी १२.३० ते १ वाजेच्या सुमारास घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेली. कुटुंबियांनी सुरुवातीला ती आजूबाजूला किंवा मैत्रिणींकडे गेली असेल या आशेने शोध घेतला. मात्र, बराच वेळ उलटूनही ती परत न आल्याने नातेवाईकांकडे कसून चौकशी करण्यात आली. सर्व बाजूंनी शोध घेऊनही तिचा कोणताही सुगावा लागला नाही. अखेर या प्रकरणी मुलीच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी किणगाव राजा पोलीस ठाण्यात मिसींग दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार विष्णू मुंढे हे करत आहेत.
किनगाव राजा: दुसऱ्या एका घटनेत, किणगाव राजा पोलीस ठाण्याच्याच हद्दीत येणाऱ्या देऊळगाव राजा तालुक्यातील एका गावातून एक २२ वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. २४ मे २०२६ रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास ही युवती तिच्या घरातून मी गावातून काही घरगुती कामासाठी व वस्तू आणण्यासाठी जाते, असे सांगून घराबाहेर पडली. मात्र, ती रात्री उशिरापर्यंत घरी परतलीच नाही. कुटुंबियांनी आणि ग्रामस्थांनी गावात तसेच आजूबाजूच्या शेतशिवारात तिचा शोध घेतला, परंतु तिचा कुठेही पत्ता लागला नाही. या घटनेचे गांभीर्य ओळखून तिच्या नातेवाईकांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठले आणि तोंडी तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी मिसींग दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार संतोष शेळके हे करीत आहेत.
चिखली: पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मकरध्वज खंडाळा येथे घडली आहे. येथील एका कुटुंबामधील ८८ वर्षीय वृद्ध महिला गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता आहेत. सदर वृद्ध मातेला घरात छोट्या-मोठ्या कारणावरून वाद झाल्यानंतर रागवून गावाला किंवा बाहेर निघून जाण्याची जुनी सवय होती, अशी माहिती तपासात समोर आली आहे. १३ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सर्व कुटुंबिय घरात हजर असताना, मी घराबाहेर जरा वेळ बसते, असे सांगून त्या घरातून बाहेर पडल्या. दुपारपर्यंत त्या घरी न परतल्याने कुटुंबियांनी शोध सुरू केला. सुरुवातीला नेहमीप्रमाणे त्या कुठे रागवून गेल्या असतील या विचाराने नातेवाईकांकडे तपास करण्यात आला, परंतु त्या कुठेही मिळून आल्या नाहीत. तब्बल १२ दिवसांच्या अथक स्थानिक शोधानंतरही काहीच माहिती न मिळाल्याने अखेर २५ मे २०२६ रोजी चिखली पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. अवघ्या काही दिवसांच्या अंतराने घडलेल्या या तीन घटनांकडे केवळ कायदेशीर गुन्हे म्हणून न पाहता त्यामागील सामाजिक, कौटुंबिक आणि मानसशास्त्रीय कारणांचा वेध घेणे अत्यंत गरजेचे बनले आहे.
