बुलढाणा जिल्ह्यात ‘बेपत्ता’चे सत्र: ४८ तासांत ५ मुलींसह एक महिला गायब; पोलीस प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवण्यात व्यस्त?

अजय टप

मलकापूर,(प्रतिनिधी): जिल्ह्यात सध्या एक अत्यंत गंभीर आणि काळजाचा थरकाप उडवणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या ४८ तासांत डोणगाव, मलकापूर, जानेफळ, चिखली आणि बोरखेडी या पाच वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चार तरुणी आणि एका महिलेसह चिमुरडी बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनांमुळे जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आता मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

डोणगाव: ३ वर्षांच्या चिमुरडीसह आई गायब!

मेहकर तालुक्यातील डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत कनका बुद्रुक येथील राजकन्या गोपाल डाखोरे (वय २८ वर्षे) ही महिला आपल्या ३ वर्षांच्या लक्ष्मी नामक मुलीसह बेपत्ता झाली आहे. आपल्या मुलाला ‘डिजेची गाडी आणून देते’ असे सांगून घराबाहेर पडलेली ही मायलेकी अद्याप घरी परतलेली नाही. गुलाबी साडी आणि गुलाबी फ्रॉक घातलेल्या या मायलेकी नेमक्या कुठे गेल्या, की त्यांचे अपहरण झाले? हा प्रश्न अनुत्तरित आहे.

मलकापूर: इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी कॉलेजमधून बेपत्ता!

दुसरीकडे, मलकापूर शहरातून कोलते इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकणारी कल्याणी जयंत पाटील (वय २२ वर्षे) ही विद्यार्थिनी बेपत्ता झाली आहे. पांढरा शर्ट, काळी पॅन्ट आणि निळी बॅग घेऊन कॉलेजला गेलेली ही तरुणी संध्याकाळी ६ वाजेनंतर गायब झाली. सुशिक्षित आणि उच्चशिक्षित मुली अशा प्रकारे भरदिवसा गायब होत असतील, तर पालकांनी आपल्या मुलांना शिक्षणासाठी पाठवायचे कसे, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.

जानेफळ: ओळखीच्या मुलासोबत मुलीचे पलायन?

जानेफळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मोहना बुद्रुक येथील १८ वर्षीय रुपाली महादेव जाधव ही तरुणी गावातीलच एका तरुणासोबत निघून गेल्याची तक्रार तिच्या वडिलांनी दिली आहे. घरात जेवणाची तयारी सुरू असतानाच मुलीने घेतलेले हे पाऊल ग्रामीण भागातील वाढत्या असुरक्षिततेचे लक्षण मानले जात आहे.

चिखली: शिलाई क्लासला गेलेली आरती अद्याप बेपत्ताच!

चिखली येथील कोलारी भागातील आरती विजय हाडे ही १८ वर्षांची मुलगी शिलाई मशीन क्लासला जाते म्हणून घरून निघाली आणि पुन्हा परतलीच नाही. पारधी बाबा मंदिर परिसरातून ती बेपत्ता झाल्याची नोंद चिखली पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.

बोरखेडी: शौचास गेली अन् गायब झाली

बोरखेडी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गोसिंग येथील रहिवासी आणि शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे एकनाथ उत्तम शिंदे (वय ४७ वर्षे) यांची मुलगी पायल एकनाथ शिंदे (वय १९ वर्षे) ही सोमवार, २७ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घरातून बाहेर पडली. तिने आपल्या कुटुंबीयांना ‘माझ्या पोटात दुखत आहे, मी शौचास जाऊन येते’ असे सांगितले होते. मात्र, बराच वेळ उलटूनही ती घरी न परतल्याने तिच्या वडिलांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पायल घरी न आल्याने हवालदिल झालेल्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नीने तात्काळ गावभर तिचा शोध घेतला. गावातील ओळखीच्या लोकांकडे, मैत्रिणींकडे आणि नातेवाईकांकडे विचारपूस केली. मात्र, कोठेही तिचा पत्ता लागला नाही. या प्रकरणी बोरखेडी पोलिसांत मिसिंग दाखल करण्यात आली आहे.

मिसिंग दाखल,म्हणजे कर्तव्य संमत नाही

कधी लग्नाचे आमिष, कधी फूस लावून पळवून नेणे, तर कधी अज्ञात कारणाने बेपत्ता होणे, या घटनांमुळे बुलढाणा जिल्ह्याची प्रतिमा डागाळली जात आहे. पोलीस प्रशासनाने केवळ ‘मिसिंग’ दाखल करून कर्तव्य संपवू नये, तर या प्रकरणांचा मुळापासून तपास करून आरोपींना बेड्या ठोकणे गरजेचे आहे.

पोलिस प्रशासनावर वाढता दबाव

जिल्ह्यात एकामागून एक घडणाऱ्या या ‘मिसिंग’च्या घटनांमुळे सर्वसामान्य जनतेत भीतीचे वातावरण आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ‘मिसिंग’चे गुन्हे दाखल होत आहेत, तपास अधिकारी नेमले जात आहेत, पण प्रत्यक्षात या मुली आणि महिला सुखरूप घरी परतणार का? हा मुख्य प्रश्न आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!