https://hindvarta.com/wp-content/uploads/2026/04/WhatsApp-Image-2026-04-29-at-10.50.45-AM.jpeg

बुलढाणा जिल्हा गुन्हेगारीने हादरला: शेगाव, खामगाव अन् मलकापुरात रक्ताचा सडा; पोलिसांच्या ‘खाकी’ला गुन्हेगारांचे आव्हान!

अजय टप

बुलढाणा, (प्रतिनिधी): शांत मानल्या जाणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यात गेल्या ४८ तासांत गुन्हेगारीचा प्रचंड उद्रेक पाहायला मिळाला आहे. शेगाव, खामगाव, मलकापूर आणि धाड पोलीस स्टेशनच्या हद्दीत हाणामाऱ्या, खुनी हल्ले, विनयभंग आणि भीषण अपघातांच्या घटनांनी जिल्हा हादरून गेला आहे. किरकोळ वादातून चाकू आणि कुऱ्हाडी निघत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून, गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला आहे की नाही, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.

शेगाव: किरकोळ वादातून चुलत भावांमध्ये ‘रक्तपात’

शेगाव शहरातील गणेश नगर भागात दोन चुलत भावांच्या कुटुंबात जुन्या वादातून तुंबळ हाणामारी झाली. मंगेश माळी यांच्या फिर्यादीनुसार, महादेव माळी आणि शहादेव माळी यांनी भाजी कापण्याच्या चाकूने हल्ला करून त्यांना जखमी केले. धक्कादायक म्हणजे, या घटनेच्या काही वेळातच दुसऱ्या गटानेही प्रति-फिर्याद दिली असून, त्यात मंगेश माळी आणि त्यांच्या कुटुंबाने हातोडी आणि काठीने मारहाण केल्याचा आरोप केला आहे. एकाच गल्लीत राहणाऱ्या दोन कुटुंबांनी एकमेकांचे रक्त सांडल्याने शेगाव शहरात खळबळ उडाली आहे.

खामगाव: मद्यधुंद ट्रक चालकाचा ‘यमदूत’; पती-पत्नीचा जागीच अंत

खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत नॅशनल हायवे क्रमांक ५३ वर माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. एका मद्यधुंद ट्रक चालकाने एमपी-०९-एचएच-५९८४ क्रमांकाच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात अतुल सिरसाठ आणि त्यांची पत्नी दिक्षा सिरसाठ यांचा करुण अंत झाला. दारूच्या नशेत सुसाट ट्रक चालवून निष्पाप जीवांचा बळी घेणाऱ्या या चालकावर कठोर कारवाईची मागणी होत आहे. तसेच, रामनगर शिवार भागात एका ट्रॅक्टर चालकाचा स्वतःच्याच हलगर्जीपणामुळे ट्रॅक्टर उलटून मृत्यू झाल्याचीही घटना समोर आली आहे.

मलकापूर: “तू बादशहाची औलाद आहेस का?” म्हणत मजुरावर हल्ला

मलकापूर शहरात गुंडागर्दीने टोक गाठले आहे. रस्त्यात उभे राहण्याच्या कारणावरून ‘पवनसुत नगर’ भागात सौरभ तळेकर या तरुणाला आरोपींनी बेदम मारहाण केली. “तू काय बादशहाची औलाद आहेस का?” असे विचारत ताराचंद परसे आणि त्याच्या साथीदारांनी सौरभला लाथाबुक्क्यांनी तुडवले. इतक्यावरच न थांबता, राजू पठ्ठे याने घराबाहेरील सेंट्रिंगची लाकडी पट्टी सौरभच्या डोक्यात मारून त्याला गंभीर जखमी केले. शहरात सरावलेल्या गुंडांच्या टोळ्या आता सर्वसामान्यांना जगणे कठीण करत आहेत.

पिंप्री गवळी: बस स्टॉपवर महिलेचा विनयभंग व कुऱ्हाडीने जीवे मारण्याची धमकी

खामगाव तालुक्यातील पिंप्री गवळी येथील बस स्टॉपवर एका ५९ वर्षीय महिलेला अश्लील शिवीगाळ करत तिच्या अंगावर कुऱ्हाड आणि लोखंडी पाईप घेऊन धावून जाण्याचा प्रकार घडला. केवळ ऑटोमध्ये बसण्याच्या कारणावरून अविनाश कैने याने महिलेचा विनयभंग करत जीवे मारण्याची धमकी दिली. दिवसाढवळ्या बस स्टॉपसारख्या सार्वजनिक ठिकाणी महिला सुरक्षित नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

धाड: विवाहाच्या मागणीवरून राडा आणि विनयभंग

धाड पोलीस स्टेशन अंतर्गत रुईखेड मायंबा येथे दोन कुटुंबात मोठे युद्ध पेटले आहे. सुनीता खंडागळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी “तुझ्या मुलासोबत माझ्या मुलीचे लग्न लावून दे”, अशी मागणी करत घरात घुसून मारहाण केली. तर दुसऱ्या बाजूने, अनिल काकफळे यांनी आरोप केला आहे की, जुन्या गुन्ह्याचा राग मनात धरून त्यांच्या मुलीचा विनयभंग करण्यात आला. एकाच गावातील दोन गटांमधील या संघर्षामुळे परिसरात तणाव वाढला आहे.

घरगुती हिंसाचार आणि अवैध धंदे

खामगावच्या चौकसे ले-आउट भागात एका विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पुणे आणि मुंबईतील सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहेरून पैसे आणण्यासाठी शारीरिक व मानसिक त्रास दिल्याचा आरोप आहे. दुसरीकडे, मलकापुरात जिल्हा परिषद शाळेसमोर खुलेआम तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या सचिन चव्हाण याला पोलिसांनी रंगेहात पकडले आहे.

दाताळा: एकाच रात्री दोन घरे फोडली; ६२ हजारांचा ऐवज लंपास

दाताळा: येथील रहिवासी गजानन मरी सातसुरे (वय ६१ वर्षे) यांचे त्यांच्या घराला लागूनच जय बजरंग प्रोव्हीजन नावाचे किराणा दुकान आहे. २६ एप्रिलच्या रात्री साडे नऊच्या सुमारास त्यांनी दुकान नीट कुलूप लावून बंद केले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता त्यांची पत्नी दुकान उघडण्यासाठी गेली असता, दुकानाच्या मागील दरवाजाचा कडा कापलेला दिसून आला. चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून काऊंटरच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली ३२ हजार रुपये रोख लंपास केली. सातसुरे हे या घटनेची तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला जात असतानाच, गावातीलच गजानन रामासा भावसार यांच्या घरातही चोरी झाल्याची माहिती समोर आली. चोरट्यांनी भावसार यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील सुमारे ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरुन पोबारा केला. एकाच रात्री झालेल्या या दोन चोऱ्यांमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी एकूण ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.

दसरखेड: शेतकऱ्याची नवी कोरी ‘युनिकॉन’ चोरट्यांनी लांबवली

दसरखेड: येथील रहिवासी महेद्र छगन महाजन (वय २५ वर्षे) यांनी अवघ्या तीन महिन्यांपूर्वी म्हणजेच १६ जानेवारी २०२६ रोजी मलकापूर येथील आनंद होंडा शोरूममधून काळ्या रंगाची होंडा युनिकॉन क्रमांक एमएच-५६-डी-२५४९ खरेदी केली होती. शेती आणि दूध विक्रीच्या व्यवसायासाठी ते या गाडीचा वापर करत असत. महेंद्र यांचे शेत आणि गुरांचा गोठा गावापासून साधारण ५०० मीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ लगत आहे. २५ एप्रिल २०२६ च्या रात्री महेंद्र हे त्यांचे वडील आणि काकांसोबत गोठ्यावर झोपलेले होते. पहाटे ३.३५ वाजेच्या सुमारास अचानक महेंद्र यांना त्यांच्या दुचाकीच्या इंजिनचा आवाज आला. आवाजाने खडबडून जागे झालेल्या महेंद्र यांनी पाहिले असता, त्यांच्या खाटेजवळ लावलेली दुचाकी एक हिरवा शर्ट घातलेला अज्ञात इसम चोरून घेऊन गेला. या प्रकरणी दसरखेड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशासनासमोर आव्हान!

जिल्ह्यात ठिकठिकाणी घडलेल्या या घटना पाहता, गुन्हेगारांचे मनोबल उंचावल्याचे चित्र दिसत आहे. चाकू, हातोडी, कुऱ्हाड यांसारख्या हत्यारांचा सर्रास वापर होणे ही गंभीर बाब आहे. पोलीस प्रशासनाने वेळीच या गुंडांचा बंदोबस्त केला नाही, तर सर्वसामान्यांचे रस्त्यावर चालणे कठीण होईल, एवढे मात्र खरे?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!