https://hindvarta.com/wp-content/uploads/2026/04/WhatsApp-Image-2026-04-29-at-10.50.45-AM.jpeg

रुईखेड मायंबा येथे ‘हायव्होल्टेज ड्रामा’; एकाच रात्री दोन कुटुंबांत तुंबळ हाणामारी, धाड पोलिसांत परस्परविरोधी गुन्हे दाखल!

अभिनय बोर्डे

धाड,(प्रतिनिधी): बुलढाणा जिल्ह्यातील धाड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रुईखेड मायंबा गावात २६ एप्रिलच्या रात्री एक विचित्र आणि तितकाच धक्कादायक प्रकार घडला. दोन शेजारील कुटुंबांमध्ये सुरू असलेला वाद इतका टोकाला गेला की, एका बाजूने ‘विनयभंगाचा’ आरोप झाला, तर दुसऱ्या बाजूने ‘लग्नाचा हट्ट आणि मारहाणीचा’ दावा करण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण गाव हादरून गेले असून धाड पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारीवरून गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

पहिली घटना: “माझ्या मुलीचे लग्न तुझ्या मुलाशी लावून दे!”

घटनेची सुरुवात २६ एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० वाजता झाली. फिर्यादी सुनिता रमेश खंडागळे (वय ४५ वर्षे) या आपल्या घरी रात्रीचा स्वयंपाक करत होत्या. यावेळी आरोपी अनिल रावजी काकफळे, शालू काकफळे आणि राधा काकफळे हे त्यांच्या दारात आले. सुनिता खंडागळे यांच्या दाव्यानुसार, आरोपींनी अचानक “तुझ्या मुलासोबत माझ्या मुलीचे लग्न लावून दे” असा अजब हट्ट धरला. सुनिता यांनी या गोष्टीला नकार दिला, तेव्हा आरोपींनी त्यांना लोटपाट करत चापटा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर जेव्हा सुनिता आणि त्यांचा मुलगा जाब विचारण्यासाठी काकफळे यांच्या घरी गेले, तेव्हा तिथेही त्यांना अश्लील शिवीगाळ करून जीवाने मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी अप क्र. १६५/२०२६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

दुसरी घटना: “जुन्या वादातून विनयभंग आणि हल्ला!”

मात्र, या घटनेला अवघ्या एका तासानंतर एक वेगळे वळण मिळाले. रात्री ८.३० च्या सुमारास अनिल रावजी काकफळे (वय ४६ वर्षे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, खंडागळे कुटुंबाने त्यांच्यावर हल्ला चढवला. खंडागळे यांच्या विरोधात आधीच काही गुन्हे दाखल असून, त्याचा राग मनात धरून शुभम खंडागळे, रमेश खंडागळे, सुनिता खंडागळे आणि पवन खंडागळे यांनी संगणमत केले.

काकफळे यांचा आरोप आहे की, शुभम खंडागळे याने त्यांच्या मुलीचा वाईट उद्देशाने हात पकडून तिचा विनयभंग केला. जेव्हा कुटुंबीय मध्यस्थी करण्यासाठी धावले, तेव्हा त्यांनाही बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी अप क्र. १६६/२०२६ अन्वये विनयभंगाचा गुन्हा नोंदवला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार शांताराम जाधव हे करीत आहेत.

गावातील चर्चा: सत्य काय?

रुईखेड मायंबा गावात सध्या हा वादाचा विषय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. “लग्नाचा हट्ट” आणि “विनयभंगाचा आरोप” या दोन परस्परविरोधी गोष्टींमुळे पोलीस गोंधळात पडले असून, हा नेमका जुन्या वैमनस्याचा प्रकार आहे की त्या रात्री अचानक काही घडले, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. दोन्ही कुटुंबांनी एकमेकांवर जीवघेणे हल्ले केल्याचा दावा केल्याने पोलीस तपासात वैद्यकीय अहवाल आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!