अजय टप
मलकापूर (प्रतिनिधी): शांतताप्रिय मलकापूर शहरात गुन्हेगारांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, क्षुल्लक कारणावरून एका तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घिर्णी रोडवरील राणा प्रताप नगर परिसरात भररस्त्यात हा राडा झाला असून, याप्रकारामुळे शहरात भीतीचे सावट पसरले आहे.
शिवाजी नगर भागातील रहिवासी गौरव राजू दहीभाते (वय ३० वर्षे) हे आपल्या ‘समर्थ चायनीज’ सेंटरवर काम पाहत असताना, त्यांना त्यांच्या घराच्या बांधकामावरील वॉचमन गजानन तडेकर यांचा फोन आला. “काही तरुण घराच्या बांधकामावर दगडफेक करत आहेत,” अशी माहिती मिळताच गौरव दहीभाते तातडीने घटनास्थळी पोहोचले. तेथे मुख्य आरोपी कृष्णा सुरेश काचकुटे (रा. गणपती नगर) हा त्याच्या इतर ३ अनोळखी साथीदारांसह उपस्थित होता. गौरव यांनी “तुम्ही दगड का फेकत आहात?” असा जाब विचारला असता, या गुंडांनी थेट वादाला सुरुवात केली. संतापलेल्या कृष्णा काचकुटे याने अतिशय हिंसकपणे गौरव दहीभाते यांच्यावर हल्ला चढवला. त्याने आपल्या हातातील लोखंडी कड्याने गौरव यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केल्याने गौरव गंभीर जखमी झाले आहेत. इतक्यावरच न थांबता, त्याच्यासोबत असलेल्या दोन ते तीन अनोळखी गुंडांनी गौरव यांना लाथाबुक्क्यांनी बदाम मारहाण केली. भररस्त्यात अर्वाच्य शिवीगाळ करत “तुला जिवंत सोडणार नाही,”*अशी धमकी देऊन हे आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
याप्रकरणी गौरव दहीभाते यांनी मलकापूर शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार रवींद्र दळवी हे करत आहेत.
गुंडांना पोलिसांचा धाक उरला नाही का?
रात्री ९ वाजेच्या सुमारास शहरात अशी घटना घडल्याने सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. किरकोळ वादातून थेट डोक्यावर वार करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल जाते, ही बाब अत्यंत गंभीर आहे. पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र दळवी या गुन्ह्याचा तपास करत असून, फरार आरोपींना पोलीस कधी बेड्या ठोकणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.