समृद्धी महामार्गावर ‘रील’चा जीवघेणा नाद:दीड वर्षांच्या चिमुरडीचा अंत, २५ प्रवासी जखमी

मेहकर,(प्रतिनिधी): ज्या महामार्गाला महाराष्ट्राच्या प्रगतीची ‘भाग्यरेषा’ म्हटले जाते, त्याच समृद्धी महामार्गावर आज माणुसकीला काळीमा फासणारी आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. ड्रायव्हर आणि क्लीनरच्या ‘रील’ बनवण्याच्या जीवघेण्या छंदामुळे एका हसत्या-खेळत्या कुटुंबाचा आधार हिरावला गेला असून, अवघ्या दीड वर्षांच्या चिमुरडीचा या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात २५ प्रवासी जखमी झाले असून, ६ जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

मुंबईहून पुसदच्या दिशेने जाणारी ही खासगी ट्रॅव्हल्स आज सकाळी सहाच्या सुमारास मेहकर टोल नाक्याजवळ पोहोचली होती. पहाटेची वेळ असल्याने बहुतांश प्रवासी गाढ झोपेत होते. मात्र, ज्यांच्या हाती या प्रवाशांच्या प्राणाची दोरी होती, ते चालक आणि वाहक मात्र मोबाईलच्या दुनियेत हरवले होते. प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक आणि वाहक धावत्या बसमध्ये मोबाईलवर ‘रील’ बनवण्यात मग्न होते. मोबाईलच्या स्क्रीनवर लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्याच्या नादात चालकाचे वेगावरचे नियंत्रण सुटले आणि काळजाचा ठोका चुकवणारा मोठा आवाज झाला. अनियंत्रित झालेली ही बस एका कारवर जाऊन जोरात आदळली. या धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आणि बसमधील प्रवाशांचा आक्रोश आसमंतात घुमला.

घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला असून, रील बनवणाऱ्या त्या चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी जनसामान्यातून होत आहे. समृद्धीवर झालेला हा अपघात केवळ एक तांत्रिक बिघाड किंवा योगायोग नसून, तो मानवी बेजबाबदारपणाचा कळस आहे. त्या चिमुरडीच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही, पण या घटने निमित्ताने तरी वाहनचालकांनी धडा घेण्याची गरज आहे. तुमचं एक ‘रील’ कुणाचं तरी ‘रिअल’ आयुष्य संपवू शकतं, याचे भान ठेवणे आता काळाची गरज बनली आहे.

एका चिमुरडीचा कोमेजला श्वास

या अपघाताचे सर्वात विदारक चित्र म्हणजे त्या दीड वर्षांच्या चिमुरडीचा अंत. ज्या वयात तिने आपल्या आई-वडिलांच्या हाताला धरून चालायला शिकायचे होते, त्याच वयात चालकाच्या एका बेजबाबदार कृत्यामुळे तिचा श्वास कायमचा थांबला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या चिमुरडीला पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आले. आई-वडिलांचा आक्रोश पाहून पाषाणालाही पाझर फुटेल अशी स्थिती घटनास्थळी होती.

रुग्णालयाचा ‘ढिसाळ’ कारभार आणि नातेवाईकांचा संताप

अपघातानंतर महामार्ग पोलिसांनी तत्परता दाखवत जखमींना तातडीने मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, खरी शोकांतिका तिथेच संपली नाही. जखमी रुग्ण रक्ताच्या थारोळ्यात विव्हळत असतानाही रुग्णालयात तब्बल एक तास एकही डॉक्टर उपलब्ध नव्हता. “वेळेवर उपचार मिळाले असते तर कदाचित परिस्थिती वेगळी असती,” अशी भावना जखमींच्या नातेवाईकांनी व्यक्त केली. प्रशासनाच्या या बेजबाबदार आणि ढिसाळ कारभारामुळे संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयातच मोठा आक्रोश केला. सध्या गंभीर जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून संपूर्ण परिसर शोकाकुल झाला आहे.

डिजिटल युगातील हा कोणता वेडेपणा?

आजच्या काळात सोशल मीडियाचे वेड कोणत्या थराला गेले आहे, याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. लोकांचे प्राण हातात असताना केवळ काही सेकंदांच्या व्हिडिओसाठी असा जीवघेणा खेळ खेळणे कितपत योग्य आहे? या अपघाताने पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा आणि चालकांच्या मानसिकतेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. आम्ही प्रवाशांनी त्यांना अनेकदा हटकले, पण ते आपल्याच धुंदीत होते. त्यांच्या एका चुकीमुळे आज अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत, अशा शब्दांत एका जखमी प्रवाशाने आपला संताप व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!