खामगाव: भेंडवळमध्ये तिघांविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल; महावितरणची धडक कारवाई

अजय टप

खामगाव (प्रतिनिधी): महावितरणच्या जळगाव जामोद ग्रामीण वीज वितरण केंद्रांतर्गत येणाऱ्या भेंडवळ परिसरात वीज चोरांविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली आहे. महावितरणच्या पथकाने केलेल्या तपासणीत घरासमोरील लघुदाब विद्युत वाहिनीवर आकडे टाकून वीज चोरी करणाऱ्या तीन जणांना रंगेहात पकडले असून, त्यांच्याविरुद्ध खामगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव जामोद ग्रामीण वीज वितरण केंद्राचे कनिष्ठ अभियंता संदिप विश्वनाथ ढोले (वय ३४ वर्षे) यांनी याप्रकरणी खामगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास महावितरणच्या पथकाने मौजे भेंडवळ येथे वीज तपासणी मोहीम राबवली होती. या तपासणी दरम्यान तीन ग्राहकांनी महावितरणच्या मुख्य वाहिनीवरून अनधिकृतपणे वीज चोरून घरामध्ये वापरत असल्याचे निदर्शनास आले.

महावितरणने दिलेल्या तक्रारीनुसार, खालील तीन आरोपींनी मागील १२ महिन्यांत मोठ्या प्रमाणात वीज चोरी केली आहे. कैलास जगदेव सोनोने (वय ५५ वर्षे) यांनी १३८ युनिट्सची वीज चोरी केली. याची मूळ रक्कम ५ हजार ११० रुपये आणि तडजोड शुल्क २ हजार रुपये, असा एकूण ७ हजार ११० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. विनोद तुकाराम काळंगे (वय ३८ वर्षे) यांनी ६०० युनिट्सची वीज चोरी केली. याची मूळ रक्कम ११ हजार रुपये आणि तडजोड शुल्क २ हजार रुपये, अशी एकूण १३ हजार रुपयांची वीज चोरी केली. काशीराम महादेव सपकाळ (वय ४६ वर्षे) यांनी देखील ६०० युनिट्सची वीज वापरली असून, त्यांच्यावरही १३ हजार रुपयांच्या वीज चोरीचा ठपका ठेवण्यात आला आहे.

या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून वीज चोरीसाठी वापरण्यात आलेली काळ्या रंगाची सर्विस वायर जप्त केली आहे. आरोपींनी थेट आकोडा टाकून अनधिकृतरीत्या वीज जोडणी केली होती. याप्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी भारतीय विद्युत कायदा २००३ (सुधारित २००७) चे कलम १३५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश गोमासे हे करत आहेत. या कारवाईमुळे वीज चोरांचे धाबे दणाणले असून, अनधिकृत वीज वापरणाऱ्यांनी वेळीच सावध व्हावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!