अजय टप
लोणार (प्रतिनिधी): एकीकडे समाज प्रगतीकडे जात असताना दुसरीकडे मात्र महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबायला तयार नाहीत. लोणार तालुक्यातील पांग्रा डोळे गावातून एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. लग्नाला नकार दिला म्हणून एका माथेफिरू तरुणाने विवाहितेच्या घरात घुसून तिच्याशी अश्लील चाळे करत जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी यातील २२ वर्षीय फिर्यादी आपल्या कुटुंबासह पांग्रा डोळे येथे राहते. आरोपी अविनाश याने काही काळापूर्वी फिर्यादीच्या आई-वडिलांकडे तिच्याशी लग्न करण्याची मागणी घातली होती. मात्र, फिर्यादीला तो मुलगा पसंत नसल्याने तिने आणि तिच्या कुटुंबाने स्पष्टपणे नकार दिला होता. अशातच २९ एप्रिल २०२६ रोजी फिर्यादीचे लग्न ठरले होते. लग्नाची धामधूम सुरू असतानाच, सूडाच्या भावनेने जळणाऱ्या अविनाशने २५ एप्रिल २०२६ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास फिर्यादी घरात एकटी असल्याची संधी साधून घरात अनधिकृतपणे प्रवेश केला. घरात शिरताच त्याने फिर्यादीचा विनयभंग करण्यास सुरुवात केली. आरोपीने वाईट उद्देशाने फिर्यादीची साडी ओढली, तिचा हात धरून तिला स्वतःकडे ओढले आणि अश्लील चाळे केले. “मला तू खूप आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे! तू माझ्याशी संबंध ठेव, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे!”, असे ओरडून सांगू लागला. फिर्यादीने त्याचा प्रतिकार करत “माझे लग्न ठरले आहे, मला त्रास देऊ नकोस,” असे सांगितल्याने आरोपीचा राग अनावर झाला आणि त्याने फिर्यादी आणि तिच्या वडिलांना जिवाने मारण्याची धमकी दिली. इतकेच करून तो थांबला नाही, तर फिर्यादी हळद फुटून येवतीवरून पुन्हा पांग्रा डोळे येथे येत असताना, आरोपीने दुचाकीवरून तिचा पाठलाग केला. लग्नाचे विधी आणि सामाजिक दबावामुळे काही दिवस शांत राहिल्यानंतर, फिर्यादीने २ मे २०२६ रोजी लोणार पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या कलम ७४, ७५ (१) आणि ७५ (२), ७८ (१), ३३३, ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस अंमलदार गजानन सानप हे करीत आहेत.
गावात दहशतीचे वातावरण
पांग्रा डोळे गावात या घटनेमुळे दहशतीचे आणि तणावाचे वातावरण आहे. एका तरुणीने लग्नाला नकार दिला म्हणून तिला अशा प्रकारे त्रास देणे, हा विकृत मानसिकतेचा कळस असल्याची चर्चा गावकरी करत आहेत. पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
