स्थानिक डॉ.डी.सी.गुप्ता नगरपरिषद शाळा क्रमांक चार येथे २६ डिसेंबर रोजी वीर बाल दिवस उत्साहात पार पडला. या वीर बाल दिवसाचे औचित्य साधून सखी वन स्टॉप सेंटरच्या केस वर्कर प्रतिभा भुतेकर यांनी वीर बालदिन विषयी जनजागृती केली.
शिखांचे दहावे गुरु गोविंद सिंह यांचे दोन पुत्र साहेब जादा जोरावर सिंग व साहेब जादा फतेहसिंग यांच्या शौर्याची गाथा म्हणून हा दिवस भारतात वीर बाल दिवस म्हणून साजरा केला जातो. अनुक्रमे नऊ व सहा वर्षाच्या असलेल्या या बालकांनी त्यावेळी मुघलांच्या समोर झुकण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांना मुघलांनी भिंतीत जिवंत गाडले. त्यांच्या या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी ९ जानेवारी २०२२ या गुरुगोविंद सिंग यांच्या प्रकाशपर्व दिवसावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ डिसेंबर हा दिवस विर बाल दिवस म्हणून भारतात साजरा करण्याची घोषणा केली. तेव्हापासून भारतभर हा दिवस बालवीर दिवस म्हणून साजरा करण्यात येतो, असे प्रतिपादन प्रतिभा भुतेकर यांनी केले. तसेच भारत शासनाकडून संकटग्रस्त महिला व बालकांसाठी सखी वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा व योजनांची माहिती दिली. बालविवाह मुक्त भारत, अभियानाची देखील माहिती देऊन बालविवाह मुक्त भारतची शपथ दिली.
यावेळी सखी वन स्टॉप सेंटरच्या कर्मचारी श्वेता जाधव व संगीता मोहिते उपस्थित होत्या. यावेळी खुशी नाटेकर या बालिकेने परिसंवादामध्ये उत्कृष्ट सहभाग नोंदवल्याबद्दल तीचा माहिती पुस्तिका देऊन गौरव करण्यात आला. मुख्याध्यापक संजय जाधव, सहाय्यक शिक्षक बळीराम दहीभजन, अंजली पाटील, मीनाक्षी पडोळ, अखिल लक्षटीवार, राहुल हिवाळे, नेहा सराफ यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती. आभार बळीराम दहीभजन यांनी मानले.