मलकापूर हादरले! विवाहितेचा छळ करणाऱ्या सासरच्या सहा जणांवर गुन्हा दाखल; दीड लाखांच्या हुंड्यासाठी दिला जिवे मारण्याचा इशारा

अजय टप

मलकापूर (प्रतिनिधी): माहेरून दीड लाख रुपये घेऊन येण्यासाठी एका २७ वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या पती, सासू-सासऱ्यांसह तीन नणंदांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. माणुसकीला काळिमा फासणारी आणि कौटुंबिक हिंसेची ही संतापजनक घटना मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दाताळा येथे उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून, हुंडाबळीच्या मानसिकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

दाताळा (ता. मलकापूर) येथील रहिवासी असलेल्या लक्ष्मी राहुलकुमार देशमुख (वय २७ वर्षे) यांचे लग्न लेवा पाटील समाजातील रितीरिवाजाप्रमाणे झाले होते. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच त्यांच्या सुखी संसाराला सासरच्या जाचाचे ग्रहण लागले. फिर्यादीचा पती राहुलकुमार मुरलीधर देशमुख याला दारूचे व्यसन असून, तो वारंवार दारू पिऊन लक्ष्मी यांना शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता. केवळ पतीच नव्हे, तर सासरच्या इतर मंडळींनीही लक्ष्मी यांचे जगणे असह्य केले होते. “तुझ्या आई-वडिलांकडून १,५०,००० रुपये घेऊन ये,” असा तगादा लावत सासरच्या मंडळींनी त्यांचा छळ मांडला होता. माहेरून पैसे आणण्यासाठी त्यांच्यावर सतत दबाव टाकला जात होता. या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, घरातल्या इतर महिलांनीही पीडितेला आधार देण्याऐवजी तिचा छळ करण्यात साथ दिली. आरोपी सासरे मुरलीधर गणपत देशमुख, सासू जयश्री मुरलीधर देशमुख यांच्यासह नणंद राजश्री सुनील बढे, वैशाली वीरेंद्र खर्ची, आणि स्मिता संदीप कोलते यांनी मिळून लक्ष्मी यांना मानसिक दृष्ट्या खचवून टाकले. पैशांच्या मागणीसाठी त्यांना अश्लील शिवीगाळ करण्यात आली आणि जर मागणी पूर्ण झाली नाही, तर जिवे मारण्याची धमकीही देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

सततच्या छळाला कंटाळून अखेर लक्ष्मी देशमुख यांनी मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन गाठले आणि आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचला. त्यांच्या लेखी तक्रारीवरून पोलिसांनी १३ एप्रिल रोजी उपरोक्त आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ८५, ११५ (२), ३५२, ३५१ (२)(३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार बाळू टाकरखेडे हे करत आहेत. दाताळा सारख्या ग्रामीण भागात घडलेल्या या घटनेने महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, दारूच्या व्यसनामुळे उध्वस्त होणाऱ्या संसारांचे विदारक चित्र समोर आले आहे. आता पोलीस या सहाही आरोपींना कधी बेड्या ठोकतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!