अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): रस्त्यावरून ओव्हरटेक करण्याच्या नादात एका अज्ञात ट्रक चालकाने दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील काका आणि पुतणे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, अपघात झाल्यानंतर जखमींना मदत करण्याऐवजी अज्ञात ट्रक चालक घटनास्थळावरून वाहन घेऊन पसार झाला. ही घटना १२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास दाताळा ते मोताळा रोडवर दाताळा गावाच्या काही अंतरावर घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणई (ता. मोताळा) येथील रहिवासी विजय विशाल सोनुने (वय २४, व्यवसाय: शिक्षण) हे त्यांचे काका मोहन राजाराम सोनुने यांच्यासह आपल्या एमएच-२८-एवाय-६४१० क्रमांकाच्या मोटारसायकलने मलकापूरकडून स्वतःच्या गावाकडे जात होते. सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ते दाताळा गावाच्या पुढे पोहोचले असता, मागून येणाऱ्या एका अज्ञात ट्रकने त्यांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावर ओव्हरटेक करण्यासाठी पुरेशी जागा नसतानाही, ट्रक चालकाने अत्यंत बेजबाबदारपणे आणि भरधाव वेगाने आपले वाहन पुढे काढण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान ट्रकच्या मागील बाजूचा जोराचा कट विजय सोनुने यांच्या दुचाकीला लागला. या धडकेमुळे दुचाकीवरील विजय आणि त्यांचे काका रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले.
अपघात घडल्यानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात नेणे किंवा पोलिसांना माहिती देणे हे वाहनचालकाचे कर्तव्य असते. मात्र, या घटनेत अज्ञात ट्रक चालकाने माणुसकीला काळिमा फासत, जखमींना रस्त्यावरच सोडून ट्रकसह पळ काढला. रस्त्यावरून जाणाऱ्या इतर प्रवाशांनी जखमींना मदत केली आणि त्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणी १३ एप्रिल रोजी फिर्यादी विजय सोनुने यांनी दिलेल्या जबाबावरून आणि वैद्यकीय प्रमाणपत्रांच्या आधारे मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम २८१, १२५ (अ) आणि १२५ (ब), मोटार वाहन कायद्याचे कलम १३४ (ए) (बी) आणि १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार बाळू टाकरखेडे हे करीत आहेत.