पत्रकाराचा बुरखा ओढून गुंडागर्दी! किराणा दुकानदाराच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला; पिंपळगाव सराईत भरदिवसा राडा

रायपूर,(बुलढाणा): कायद्याचा धाक संपला की काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. चिखली तालुक्यातील पिंपळगाव सराई येथे मागील वादाची कुरापत काढून एका तथाकथित पत्रकाराने आपल्या साथीदारांसह एकाच कुटुंबातील सदस्यांना लाथाबुक्क्यांनी, दगडांनी आणि काठीने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी रायपूर पोलिसांनी ५ आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

पिंपळगाव सराई येथे किराणा दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करणारे अलीयार खा अब्दार खा पठाण (वय ५५ वर्षे) यांचा आणि आरोपी जावेद शाह यांच्यात गावातील मशिदीमध्ये मौलाना ठेवण्याच्या कारणावरून गेल्या महिन्याभरापासून वाद सुरू होता. याच वादाचा वचपा काढण्यासाठी आरोपी जावेद शाह फिर्यादीच्या घरी गेला. फिर्यादीची सून शाहीस्ता परवीन घरी एकटी असताना, आरोपीने तिला अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तिने जाब विचारला असता, आरोपीने “तुम्ही माझ्याविरुद्ध पोलीस स्टेशनला रिपोर्ट का दिला? मी पत्रकार आहे, तुमची बदनामी करील आणि तुमचे घरचे दिसले तर त्यांना जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिली. फिर्यादी अलीयार खा आणि त्यांचा भाऊ आरोपी जावेदच्या घरासमोर जाब विचारण्यासाठी गेले. मात्र, तिथे आधीच दबा धरून बसलेल्या आरोपी जावेद शाह अयुब शाह, अयुब शाह गुलाब शाह, जब्बार शाह, इलयास शाह अयुब शाह आणि नियाज अली शाह या सर्वांनी “तुम्हाला आधीचा मार कमी पडला का?”, असे म्हणत फिर्यादीवर हल्ला चढवला. तसेच फिर्यादीचा भाऊ अस्लम खा, मुलगा इलियास आणि पुतणी यांना घेराव घालून लाथाबुक्क्यांनी, दगड आणि काठ्यांनीही मारहाण केली.

याप्रकरणी अलीयार खा अब्दार खा पठाण यांच्या फिर्यादीवरून रायपूर पोलिसांनी उपरोक्त आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम १८९(२), १९१(२), १९०, ११५(२), ११८(१), २९६, ३५२, ३५१(२), ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार कैलास खार्डे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!