नांदुरा, (प्रतिनिधी): कायद्याचा सन्मान राखणे तर लांबच, पण चक्क न्यायालयाने दिलेल्या आदेशाला पायदळी तुडवून दहशत माजवणाऱ्या एका इसमाने नांदुऱ्यात संतापजनक प्रकार केला आहे. मुल्ला पुरा भागात कोर्टाने दिलेल्या ताबा आदेशाचे उल्लंघन करत, घरात घुसून एका महिलेचा अश्लील शब्दांत विनयभंग करण्यात आला. या प्रकरणाने नांदुऱ्यात मोठी खळबळ उडाली असून, “न्यायालयाचा आदेश मोठा की गुंडशाही?”, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
यातील फिर्यादी रियाज खान इलियास खान आणि आरोपी अस्लम बेग कादर बेग यांच्यात घराच्या मालकी हक्काचा वाद न्यायालयात प्रलंबित होता. न्यायालयाने या घराचा ताबा फिर्यादी रियाज खान यांच्याकडे सोपवून, आरोपीला त्या परिसरात येण्यास सक्त मनाई केली होती. मात्र, कायद्याची कोणतीही भीती उरली नसल्यागत आरोपी अस्लम बेगने हा आदेश धुडकावून लावला. १२ एप्रिलच्या रात्री साडे नऊच्या सुमारास, फिर्यादी आणि त्यांचे कुटुंबीय घरात असताना आरोपी अस्लम बेगने बेकायदेशीरपणे घरात प्रवेश केला. “हे घर माझे आहे, तू इथून निघून जा,” अशी ओरडाओरड त्याने सुरू केली. फिर्यादीने त्याला न्यायालयाच्या ‘स्टे’ आणि ‘ऑर्डर’ची आठवण करून दिली असता, आरोपीचा संयम सुटला आणि त्याने कायद्याचा उघड अपमान करत तांडव सुरू केले. घराचा ताबा मिळवण्यासाठी आरोपीने क्रूरतेची सीमा ओलांडली. त्याने फिर्यादीची आई शाहीना सुलताना यांना भररस्त्यात आणि घरात अत्यंत अश्लील, घाणेरड्या आणि लज्जास्पद भाषेत शिवीगाळ केली. “तुला नग्न करून टाकीन,” अशी धमकी देत त्यांच्या अस्मितेवर घाला घातला. इतकेच नाही तर संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊन त्याने परिसरातील शांतता भंग केली.
या प्रकरणी फिर्यादी रियाज खान यांनी नांदुरा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी उपरोक्त आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२९ (३), २९६, ३५१ (२) व ३५१ (३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार सैय्यद हे करत आहेत.