अजय टप
नांदुरा (प्रतिनिधी): नांदुरा शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षेचा पेपर देण्यासाठी घराबाहेर पडलेली १८ वर्षीय तरुणी रहस्यमयीरीत्या बेपत्ता झाली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, हनुमान नगर भागातील रहिवासी आणि महावितरण कर्मचारी संतोष रामदास भिवटे यांची मुलगी साक्षी संतोष भिवटे हिचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोमवार १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास साक्षी घराबाहेर पडली होती. तिने वडिलांना “मी कोठारी हायस्कूलमध्ये पेपर देण्यासाठी जात आहे”, असे सांगितले. साधारणपणे सकाळी १० वाजेपर्यंत ती घरी परतणे अपेक्षित होते. मात्र, वेळ उलटून गेल्यानंतरही ती न आल्याने पालकांच्या काळजाचा ठोका चुकला. साक्षीच्या वडिलांनी तात्काळ कोठारी हायस्कूल गाठून तिथे चौकशी केली, मात्र ती तिथे मिळून आली नाही. त्यानंतर त्यांनी बस स्टँड परिसर, रेल्वे स्टेशन आणि सर्व नातेवाईकांकडे विचारपूस केली. सर्वत्र शोध घेऊनही साक्षीचा कोणताही सुगावा लागला नाही. बेपत्ता तरुणीची उंची ५ फूट २ इंच, रंग गोरा, सडपातळ बांधा असून तिने अंगात कोठारी हायस्कूलचा निळसर रंगाचा गणवेश आणि पायात काळ्या रंगाची चप्पल घातलेली आहे.
या प्रकरणी फिर्यादी संतोष रामदास भिवटे (वय ४८ वर्षे) यांच्या तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी मिसींग दाखल केली असून पुढील तपास संदिपसिंग सोळंके हे करत आहेत. वरील वर्णनाची तरुणी आढळून आल्यास किंवा तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास, तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.