अजय टप
बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): जिल्ह्यात सध्या एक धक्कादायक आणि चिंताजनक कल समोर येत आहे. अवघ्या २४ तासांच्या अंतरात खामगाव ग्रामीण आणि बिबी पोलीस स्टेशन अंतर्गत दोन विवाहित महिला आपल्या मुलाबाळांसह संशयास्पद रित्या बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्या आहेत. एका घटनेत आई आपल्या दोन चिमुकल्यांसह ‘दळण आणते’ असे सांगून घराबाहेर पडली ती अद्याप परतलीच नाही, तर दुसऱ्या घटनेत एक विवाहित महिला कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेल्याने परिसरात खळबळ माजली आहे.
‘दळण आणते’ सांगून निघाली अन् दोन मुलांसह बेपत्ता झाली!
खामगाव ग्रामीण: खामगाव तालुक्यातील अटाळी येथील एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. फिर्यादी योगेश वसंता सोनाग्रे (वय ३३ वर्षे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची पत्नी शारदा योगेश सोनाग्रे (वय ३० वर्षे) ही आपल्या प्रेम ( वय १४ वर्षे) आणि परी (वय ४ वर्षे) या दोन मुलांसह ३ मे २०२६ रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास दळण घेऊन येते, असे सांगून घराबाहेर पडली. मात्र, रात्र उलटूनही ही मायलेकरं घरी परतली नाहीत. शारदा यांनी अंगात विटकरी रंगाचा पंजाबी ड्रेस आणि गुलाबी रंगाचा स्टोल परिधान केला आहे. त्यांच्याकडे रियलमी कंपनीचा मोबाईल आहे. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी मिसिंग दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार बाळकृष्ण फुंडकर हे करत आहेत.
बिबी परिसरातून २३ वर्षीय विवाहिता बेपत्ता!
बिबी: दुसरी घटना लोणार तालुक्यातील बिबी येथे घडली आहे. अनील सुभाष मांन्टे (वय ३२ वर्षे) यांची २३ वर्षीय पत्नी प्रियंका अनील मांल्टे ही ४ मे २०२६ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेली. प्रियंका यांनी अंगात पिवळसर रंगाचा टॉप, ब्लॅक लेगी आणि चेहऱ्याला स्कार्प बांधलेला आहे, तसेच त्यांच्या पाठीवर एक बॅग असल्याची माहिती आहे. याप्रकरणी बिबी पोलिसांनी मिसिंग दाखल केली असून पुढील तपास पोलीस अंमलदार रविराज चव्हाण हे करीत आहेत.
पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान!
एकीकडे जिल्हा प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न करत असताना, दुसरीकडे भरदिवसा महिला आणि मुले बेपत्ता होण्याच्या घटनांनी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या महिलांनी स्वतःहून घर सोडले की यामागे काही मोठी टोळी किंवा घातपाताचा प्रकार आहे? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. वरील वर्णनाची कोणतीही व्यक्ती आढळल्यास किंवा त्यांच्याबद्दल काहीही माहिती मिळाल्यास, तात्काळ संबंधित पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
