अजय टप
बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): एकीकडे उन्हाळ्याचा कडाका वाढत असताना, दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस दलाची झोप उडाली आहे. गेल्या २४ ते ४८ तासांत जिल्ह्याच्या विविध पोलीस स्टेशन अंतर्गत तब्बल १० तरुण-तरुणी आणि महिला बेपत्ता झाल्याच्या धक्कादायक नोंदी झाल्या आहेत. यात सर्वात खळबळजनक घटना चिखली शहरात घडली असून, ज्या मुलीच्या हातावर लग्नाची मेहंदी सजली होती, तीच ‘नवरी’ लग्नाच्या दोन दिवस आधी प्रियकरासोबत पसार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
🔴चिखली: मेहंदीचा रंग सुकण्यापूर्वीच नवरी गायब!
चिखलीतील गांधीनगर भागातील एक (वय २४ वर्षे) या तरुणीचे १३ मे रोजी लग्न होते. १० मेच्या रात्री मोठ्या उत्साहात मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. मात्र, ११ मेच्या पहाटे ती अचानक घरातून गायब झाली. घरच्यांनी तिचा शोध घेतला असता, तिचा फोनही बंद आढळला. धक्कादायक म्हणजे, ही मुलगी गांधीनगरमधीलच सागर चव्हाण नावाच्या तरुणासोबत बोलताना आढळली होती, त्यामुळे ती त्याच्यासोबतच पसार झाली असावी, असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. लग्नाच्या मांडवातून नवरीने घेतलेली ही ‘एक्झिट’ सध्या चिखलीत चर्चेचा विषय ठरली आहे.
🔴 खामगावात दोन तरुणी बेपत्ता
खामगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून दोन तरुणी बेपत्ता झाल्या आहेत. मेहबुबनगर येथील १९ वर्षीय अल्फीया बी शेख अयास ही तरुणी ८ मेच्या रात्री घरून निघून गेली आहे. ती गुलाबी आणि काळ्या रंगाचा बुरखा घालून होती. दुसरीकडे, सुटाळा येथील माजी सैनिकाची २२ वर्षीय मुलगी श्रेया प्रदीप इंगळे ही सुद्धा ११ मेच्या पहाटे कोणालाही न सांगता निघून गेली आहे.
🔴 मलकापूर आणि जळगाव जामोदमध्येही तेच चित्र
मलकापूरच्या संत कवरराम नगरमधून २६ वर्षीय कपिल तलरेजा हा तरुण ‘बाहेरगावी फिरायला जातो’ असे सांगून निघाला, तो अद्याप परतलेला नाही. जळगाव जामोद तालुक्यातील गाडेगाव येथील २० वर्षीय वैष्णवी वरणकर ही मुलगी ‘आधार कार्डची पावती आणते’ असे सांगून घराबाहेर पडली ती पुन्हा परतलीच नाही. तसेच पिंपळगाव काळे येथील १९ वर्षीय गायत्री नेमाडे ही तरुणी रात्री झोपेत असताना अचानक गायब झाली आहे.
🔴 अंढेरा: अल्पवयीन मुलीचे अपहरण?
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत मेरा बुद्रुक येथील १७ वर्षीय मनीषा गायकवाड हिला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार तिच्या आईने दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७(२) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
🔴 सोनाळा: शेंबा येथील १९ वर्षीय विवाहिता शांता पवन चंगळ ही लग्नासाठी पाहुणी आली असताना रात्रीतून गायब झाली. तिच्या हातावर ‘पवन’ आणि ‘रविण’ अशी नावे गोंदलेली आहेत.
🔴 धामणगाव बढे: कोऱ्हाळा बाजार येथील १८ वर्षीय रेणुका धायडे ही मैत्रीणीच्या लग्नाला जाते असे सांगून गेली आणि बेपत्ता झाली.
🔴 बिबी: भुमराळा येथील ३० वर्षीय विवाहिता रेणुका पिसाळ ही १० मे रोजी दुपारी कोणालाही न सांगता निघून गेली आहे.
प्रशासनासमोर आव्हान
एकाच दिवशी आणि एकाच जिल्ह्यातून इतक्या मोठ्या प्रमाणावर तरुण पिढी बेपत्ता होणे, ही चिंतेची बाब बनली आहे. यातील अनेक घटनांमध्ये प्रेमप्रकरण, सोशल मीडियाचा प्रभाव किंवा कौटुंबिक वाद कारणीभूत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या वर्णनाच्या व्यक्ती आढळल्यास, त्यांनी तातडीने संबंधित पोलीस स्टेशनशी किंवा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
