बुलढाणा,(प्रतिनिधी) :
१ जानेवारी हा ‘एसीएफ’ अश्विनी आपेट यांचा वाढदिवस. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाच म्हणजे ३१ डिसेंबर रोजी त्यांना लाच घेताना रंगेहात पकडले. त्यामुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना वाढदिवसदिनी ‘बेड्यां’चे गिफ्ट दिल्याची मजेदार चर्चा जिल्हाभरात रंगली आहे. सोबतच त्यांना नवीन वर्षाचे सिलिब्रेशन कोठडीत करावे लागल्याचे बोलल्या जात आहे.
अश्विनी वसंत आपेट (वय ३५, मूळ रा. गिरवली, ता, अंबेजोगाई, जि. बीड) व कनिष्ठ लिपिक अमोल वसंत मोरे (वय ३८) या दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शेतामधील झाडाची खरेदी केल्यानंतर कटाई करून आरामशीनपर्यंत व्यापाऱ्याकडे लाकडे नेण्याचा व्यवसाय एका व्यक्तीचा आहे. कुठलीही कारवाई न करता हा व्यवसाय चालू देण्यासाठी अश्विनी आपेट व लिपिक अमोल मोरे हे वार्षिक ३० हजार रुपये लाच मागत होते. यासंदर्भात तक्रारकर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. त्यानुसार एसीबीच्या वतीने ३१ डिसेंबर २०२५ रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली. आपेट यांनी तक्रारकर्त्याकडून ३० हजारांचा वार्षिक हप्ता देण्याची मागणी केली. अखेर तडजोडीअंती १५ हजार रुपये लाच स्वीकारण्यास संमती दिली. अखेर कार्यालयात सापळा यशस्वी करण्यात आली. पैसे घेताच आपेट व मोरे यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक भागोजी चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी रमेश पवार, पोलीस निरीक्षक विलास गुसिंगे, सहायक फौजदार श्याम भांगे, पोहेकॉ प्रवीण वैरागी, राजेंद्र क्षीरसागर, दीपक जाधव, अमोल झिने, जगदीश पवार, पोकॉ गजानन गाल्डे, रणजित व्यवहारे, शैलेश सोनवणे, स्वाती वाणी, नितीन शेटे, अर्शद शेख व टीमने ही कारवाई यशस्वी केली.
‘थर्टी फर्स्ट’ चौकशीतच
डिसेंबरचा अखेरचा दिवसही ‘एसीबी’च्या टार्गेटमध्ये भर पाडणारा ठरला. लाच घेणे आणि देणे गुन्हा आहे. अशा लाचखोरांवर कारवाई करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सज्ज असतो. २०२५ या वर्षातील डिसेंबर महिन्याचा अखेरचा दिवस म्हणजेच ३१ डिसेंबर, या दिवशीही ‘एसीबी’च्या कारवाईमध्ये एका प्रकरणाने वाढ झाली. जुन्या वर्षाला अलविदा म्हणत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबर हा ‘थर्टी फर्स्ट’ म्हणून साजरा केला जातो. मात्र, या लाचखोरांचा ‘थर्टी फर्स्ट’ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीतच गेला.