स्मार्ट बुलढाणा

मिशन वात्सल्य’! ३५ तासांनंतर बिबट्याचे पिलू आईच्या कुशीत!

डोगणगाव,(प्रतिनिधी) : कळंबेश्वर शिवारातून ताटातूट झालेल्या बिबट्याच्या पिलाची आणि मातेची अखेर भेट झाली. ३५ तासांनंतर माता आपल्या पिलास नेण्यासाठी आली. वनविभागाने दोन दिवसांपासून सुरू केलेले ‘मिशन वात्सल्य’ अखेर पूर्ण झाले.

घाटबोरी वनपरिक्षेत्रातील कळंबेश्वर शिवारात सुभाष खुरद यांच्या शेतातील गोठ्यात ३१ डिसेंबरच्या सकाळी आठ वाजता नर-मादी बिबटे आढळून आले होते. राजेश खुरद याला धडक मारून त्यांनी पलायन केले. तोंडात धरून दोन पिले सोबत नेण्यात आली. मात्र, एक पिलू तिथे सुटले. वनविभागाने ३१ डिसेंबरला आईपासून दुरावलेले पिलू भेट घडविण्यासाठी तिथेच शेतात ठेवले होते. परंतु त्याची आई आली नसल्याने पुन्हा दुसऱ्या दिवशी १ जानेवारीला सायंकाळी ‘मिशन वात्सल्य’ राबविण्यात आले. एका कॅरेटमध्ये पिलू ठेवण्यात आले. आजूबाजूला मोशन सेन्सर असलेले कॅमेरे लावण्यात आले होते. तसेच वन विभागाचे कर्मचारी खबरदारी बाळगून सुरक्षित ठिकाणी थांबले होते. १ जानेवारीला सायंकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी माता कॅरेटजवळ आली. आजूबाजूचे निरीक्षण केल्यानंतर कॅरेट खाली पाडले आणि पिलास घेऊन बिबट निघून गेली.

वनविभागाने थर्मल ड्रोनद्वारे पाहणी करीत मिशन वात्सल्य पूर्णत्वास आल्याची खात्री केली. यासाठी जिल्हा उपवनसंरक्षक सरोज गवस, सहायक वन संरक्षण अधिकारी वैभव काकडे, आरआरयू टीम व घाटबोरी वनपरिक्षेत्र अधिकारी अंकुश येवले व त्यांच्या सहकाऱ्यांनी मेहनत घेतली. सलग दोन दिवस कोणताही विसावा न घेता सर्च ऑपरेशन तसेच मिशन वात्सल्याची तयारी केली. अखेर ३५ तासांनी पिलू आईच्या कुशीत शिरले.

 

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!