मुंबई,(प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या वरिष्ठ स्तरावर आज मोठे फेरबदल करण्यात आले. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांच्या रिक्त जागी १९९० च्या तुकडीचे अनुभवी भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकारी सदानंद दाते यांची नेमणूक करण्यात आली. दाते यांनी आज रश्मी शुक्ला त्यांच्याकडून महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक पदाचा पदभार स्वीकारला.
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी आपल्या कार्यकाळात राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या निवृत्तीनंतर आता राज्याच्या पोलीस दलाची धुरा सदानंद दाते यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. सदानंद दाते यांनी यापूर्वी केंद्र आणि राज्य स्तरावर विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले असून विशेषतः दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एनआयए) मधील त्यांची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे.
सदानंद दाते यांच्या शिस्तप्रिय कार्यपद्धतीमुळे आणि दांडग्या अनुभवामुळे महाराष्ट्र पोलीस दल आगामी काळात अधिक सक्षम आणि आधुनिक होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. सायबर गुन्हेगारी आणि सुरक्षा विषयक आव्हानांचा सामना करण्यासाठी त्यांचे नेतृत्व दलाला नवी दिशा देणारे ठरेल,यात शंका नाही.