क्राईम जगत

मेहकरमध्ये पोटाच्या गोळ्यासह पत्नीचा खून

हृदयद्रावक घटनेने जिल्ह्यात खळबळ

     मेहकर,(प्रतिनिधी) :
 मनात निर्माण होणारा संशय, संशयातून उत्पन्न होणार राग माणसात शैताण पैदा करतो. आणि हाच शैताण वाळवी बणून संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतो. असाच काहीसा प्रकार आज २९ डिसेंबर रोजी मेहकर शहरात घडला. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत एका नराधम पतीने आपल्या पत्नीसह अवघ्या चार वर्षांच्या पोटच्या गोळ्याची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केली. या घटनेने बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून या कृत्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
मेहकर शहरातील शिक्षक कॉलनीतील रहिवासी असलेला राहुल हरी मस्के (वय ३३ वर्षे) याचा विवाह रुपाली (वय २८ वर्षे) हिच्याशी झाला होता. सुरुवातीला या दोघांनी सुखाने संसार केला. त्यांच्या या सुखाच्या वेलीवर रियांश नावाचे एक फूलही उमलले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राहुलच्या मनात पत्नीच्या चारित्र्याबद्दल संशयाचा भूताने जन्म घेतला आणि त्यांच्यात वारंवार खटके उडायला सुरुवात झाली. २९ डिसेंबरच्या रात्री संपूर्ण जग गाढ झोपेत असतांना राहुलमधील सैतान जागी झाला. पहाटे दोन वाजताच्या सुमारास राहुलने रागाच्या भरात हातात कुऱ्हाड घेऊन पत्नी रुपाली आणि निरागस मुलगा रियांश (वय ४ वर्षे) यांच्या डोक्यावर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या माय-लेकांचा आक्रोश शांत झाला आणि एका हसत्या-खेळत्या कुटुंबाचा या ठिकाणी अंत झाला.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी ११२ क्रमांकावर संपर्क साधला. पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बिरांजे यांनी तातडीने आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. पोलिसांनी आरोपी राहुलला तात्काळ बेड्या ठोकल्या. गंभीर जखमी रुपालीला उपचारार्थ छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले. मात्र, उपस्थित डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. चिमुरड्या रियांशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मेहकर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या रंक्तरंजीत घटनेमुळे समाजाच्या मानसिकतेवर चाबूक ओढला गेला आहे. स्वत:च्या हाताने ज्या लेकराला मोठे करायचे, तीच्या सोबत आयुष्य काढायचे त्यांच्याच बळी घेताना आरोपी राहुलचे हात कापले नसतील का?, संवाद नसलेल्या नात्यात जेव्हा संशयाचा शिरकाव होतो, तेव्हा त्याचे रूपांतर अशा क्रूर हत्याकांडात झाल्याशिवाय राहत नाही. बापाच्या मायेची गरज असताना चार वर्षांच्या रियांशला आपल्याच बापाच्या कुऱ्हाडीचे सपासप वार झेलावे लागले, ही अत्यंत दुदैवी आणि तितकीच निंदनीय घटना आहे. कुटुंबात अशा वादाच्या ठिणग्या पडत असतील, तर समाजाने आणि नातेवाईकांनी यामध्ये वेळीच हस्तक्षेप करून समुपदेशन करण्याची गरज आहे. अन्यथा, अशा ‘शैतानी’ प्रवृत्ती अधीक फोफावत राहतील, यात शंका नाही.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!