स्मार्ट बुलढाणा

मलकापूरात ‘हाय कोर्टा’च्या आदेशाची पायमल्ली?

नगर सेवा समितीच्या कार्यवाहांसह चौघांवर गुन्हा; मलकापूरच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ

मलकापूर,(प्रतिनिधी) : लि.भो.चांडक विद्यालयातील शिक्षक नियुक्तीचा वाद आता थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणे, प्रशासकीय दिशाभूल करणे आणि एका पात्र शिक्षकाला मानसिक त्रास देणे, या आरोपावरून नगर सेवा समितीचे कार्यवाह तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक जयंत मुकुटराव राजुरकर यांच्यासह चौघांविरुद्ध मलकापूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लि.भो.चांडक विद्यालयाच्या कनिष्ठ महाविद्यालयात योगेश वामन फासे हे ११/१२ वी (उच्च माध्यमिक) स्तरावर अंशत: अनुदानित तत्त्वावर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सर्व शैक्षणिक पात्रता पूर्ण असतानाही, महाविद्यालयात रिक्त झालेल्या पूर्ण अनुदानित जागेवर योगेश फासे यांची नियुक्ती न करता, पात्रता नसलेल्या दुसऱ्या एका शिक्षिकेची नियुक्ती करण्यात आली. तत्कालीन शिक्षण उपसंचालक (अमरावती) यांनी या बेकायदेशीर नियुक्तीला मान्यता दिली होती. या अन्यायाविरुद्ध योगेश फासे यांनी माननीय उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने कागदपत्रांची पडताळणी करून सदर शिक्षिकेची मान्यता रद्द ठरवली व त्या जागेवर नियमानुसार पात्र उमेदवार फासे यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते.

पत्नीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
आपल्या पतीला होणारा छळ आणि कायदेशीर हक्क नाकारला जात असल्याने फासे यांच्या पत्नी अ­ॅड. किरण फासे यांनी मलकापूर शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी जयंत मुकुटराव राजुरकर (कार्यवाह, नगर सेवा समिती), गिरीश वैद्य (सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक), राहुल देशमुख (संबंधित शिक्षिकेचे पती), भरत देशमुख (ग्रंथपाल तथा देशमुख यांचे नातेवाईक यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
शैक्षणिक वर्तुळात चर्चेला उधाण
एका सेवानिवृत्त मुख्याध्यापकावर आणि संस्थेच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे मलकापूरच्या शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्या या प्रकरणातील सूत्रधारांवर आता पोलीस आणि शिक्षण विभाग काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!