बाप्पो! १ कोटी २७ लाखांचे सोने हस्तगत!

पुणे,(प्रतिनिधी):
आपल्या गुन्हेगारी कारवायांना अंजाम देण्यासाठी गुन्हेगार केव्हा काय शक्कल लढवेल हे सांगता येत नाही. अशीच काहीशी क्लृप्ती लढवित एका सराईत गुन्हेगाराने सराफा दुकानातून तब्बल एक किलो सोन्याचे बिस्किटे लंपास केली. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी या चोरट्याने चक्क मोबाइल फोनचा वापर टाळला. एवढ्यावरच न थांबता यु-ट्यूबवरून पोलिसांना गुंगारा देण्याचे धडे गिरवून घेतले. मात्र, म्हणतात ना “पुलिस के हाथ लंबे होते हैं”, असाच प्रत्यय या ठिकाणी आला. मूळचा चांडोळ (जि. बुलढाणा) येथील रहिवासी असलेला व सध्या पुणे पोलीस दलात फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये नेमणुकीस असलेले “बहिर्जी नाईक” पुरस्कार प्राप्त गजानन सोनूने यांनी मोठ्या शिताफीने चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईत चोरीला गेलेले १०० टक्के सोने (१ किलो) हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला.
पुणे शहरातील बुधवार पेठ परिसरात सुनील सावंत यांच्या मालकीचे  ‘प्रिसियस रिफायनरी’ नावाचे सराफा दुकान आहे. याच दुकानात काम करणाऱ्या प्रथमेश गणेश मंडले (वय १८, रा. सांगोला, सोलापूर) या तरुणाची सोन्याचे बिस्कीट बघून नियत फिरली. या चोरीला अंजाम देण्यासाठी आरोपी प्रथमेशने ” चोरी कशी करावी”, पोलीस पाठलाग कसा करतात’ याचे व्हिडिओ पाहून सखोल अभ्यास केला. आणि ठरलेल्या दिवशी अचूक संधी साधून दुकानातील लॉकरमधून १ किलो वजनाचे सोन्याची बिस्किटे लंपास केली. याप्रकरणी सुनील सावंत यांच्या फिर्यादीवरून फारसखाना पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी तपास सुरू केला.
पोलीस उप-आयुक्त कृषीकेश रावले आणि प्रभारी अधिकारी उत्तम नामवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक अरविंद शिंदे, गजानन सोनुने व त्यांच्या टीमने आरोपीचा माग काढत मोठ्या शिताफीने त्यास सांगलीतील जत येथून बेड्या ठोकल्या. तसेच त्याच्या ताब्यातून चोरलेले काही सोने कोल्हापूर येथील कारागीर शकील बशीर मोमीन याला विकले होते, त्यालाही पोलिसांनी अटक करून अल्पावधीतच या गुन्ह्याचा पर्दाफास केला.
चांडोळच्या सुपुत्राचा पुण्यात पुन्हा एकदा डंका!
किचकट आणि तेवढ्याच गुंतागुंतीच्या या तपासात फरासखाना पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार गजानन सोनुने यांनी मोलाची भूमिका बजावली. त्याबद्दल पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.वसोनुने हे मूळचे चांडोळ (ता. जि. बुलढाणा) येथील रहिवासी असून, त्यांच्या कर्तव्यतत्परतेसाठी त्यांना यापूर्वी ‘बहिर्जी नाईक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि कौशल्याचा फायदा या गुन्ह्याचा छडा लावण्यात झाला,हे विशेष!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!