स्मार्ट बुलढाणा

धाडचे ‘तिरके’ पथदिवे अपघाताला  आमंत्रण!

प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे असुधांचा बाजार; प्रशासन अद्यापही गाढ झोपेत

अभिनय बोर्डे
बुलढाणा,(प्रतिनिधी) :
ऐतिहासिक धाडनगरी सध्या एक ना अनेक समस्यांच्या विळख्यात सापडली आहे. एकीकडे या गावाला ‘नावाजलेली बाजारपेठ’ म्हणून ओळख आहे, तर दुसरीकडे प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे या ठिकाणी असुधांचा बाजार भरला आहे. प्रशासनाच्या सोयीस्कर दुर्लक्षामुळे गावातील मुख्य रस्त्यावरील पथदिव्यांची अत्यंत भीषण अवस्था झाली आहे. हे पथदिवे कोणत्याही क्षणी नागरिकांच्या अंगावर कोसळण्याची भीती व्यक्त असताना प्रशासन गाढ झोपेत आहे.
बुलढाणा ते छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या धाडनगरीचा मुख्य रस्ता फक्त गावाचीच नव्हेतर पंचक्रोशीची जीवनवाहिनी आहे. या रस्त्यावरून दिवसाकाठी हजारो वाहने, व्यापारी आणि शाळकरी मुलांची वर्दळ असते. या रस्त्याच्या मधोमध बसविण्यात आलेले पथदिवे वाहनांच्या धडका लागून तिरके झालेले आहेत. पथदिव्यांची ही अवस्था होऊन अनेक महिने उलटले. मात्र, प्रशासनाला ते सरळ करण्यास सवड मिळत नसल्याने ते आजही ‘तिरक्या’च अवस्थेत उभे आहेत. सुसाट वाहणाऱ्या वाऱ्याच्या झोतानेही ते कधी खाली कोसळतील याचा नेम नाही. त्यामुळे ते आजघडीला चालत्या-फिरत्या मृत्यूचे सापळे बनले आहेत.
जिकडे तिकडे अंधारच
हे पथदिवे केवळ तिरकेच नाहीत, तर ते बऱ्याच दिवसांपासून बंद अवस्थेत आहेत. रात्रीच्या वेळी या मुख्य रस्त्यावर काळोखाचे साम्राज्य असते, ज्यामुळे वाहनधारकांना आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. ‘दिव्याखाली अंधार’ या उक्तीप्रमाणे पथदिवे असूनही उपयोग शून्य असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
निष्पाप नागरिकाचा जीव धोक्यात
महामार्ग प्राधिकरणामार्फत बसवण्यात आलेले हे पथदिवे अद्यापपर्यंत ग्रामपंचायत प्रश्नाकडे वर्ग करण्यात आलेले नाही. तर पुढील काही वर्ष त्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या कंत्राटदाराने देखील पथदिवे बसवले तेव्हापासून आजपर्यंत त्याकडे फिरकूनही बघितले नाही. त्यामुळे ग्रामस्थांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. एखाद्या निष्पाप नागरिकाचा जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येईल का? असा सवालही आता उपस्थित केला जात आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!