क्राईम जगत

बोटींवर जिलेटीन कांड्या फोडून प्रशासनाची दिवाळी!

अवैध रेती उपसा करणाऱ्या माफियांना दणका; महसूल व पोलीस प्रशासनाची संयुक्त कारवाई

देऊळगाव राजा,(प्रतिनिधी) :

प्रशासनाकडून अवैध रेती उत्खनन व वाहतूकीविरुध्द कारवाईसत्र सुरु असतांनाही रेती माफियांची मुजोरी थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. तर प्रशासनाकडूनही कारवायांचे दणके देणे सुरुच आहे. दरम्यान, महसूल व पोलीस विभागाने पुन्हा एकदा २४ डिसेंबरच्या पहाटे सहा वाजता खडकपूर्णा परिसरात संयुक्त दणका देत धडक कारवाई केली. या कारवाईत अवैध रेती उत्खनन करणाऱ्या चार बोटींसह ५५ लाख रुपयांचा मुद्देमाल पकडून जिलेटीन कांड्यांच्या साह्याने उडवून देण्यात आला.

जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे व देऊळगाव राजा तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मेहुणा राजा येथील खडकपूर्णा धरणाच्या विश्रामगृहाजवळील जलाशयात ही कारवाई करण्यात आली. गस्ती पथकाला जलाशयात अवैधपणे रेती उत्खनन करणाऱ्या दोन मोठ्या फायबर बोटी व दोन इंजिन बोटी आढळून आल्या. सदर बोटींसह त्यावर काम करणाऱ्या तीन परप्रांतीय मजुरांना पोलीस विभागाने ताब्यात घेतले. त्यानंतर या सर्व बोटी सीनगाव जहागीर येथील जलाशय काठावर सुरक्षितरीत्या आणून महसूल व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत ब्लास्टिंगद्वारे नष्ट करण्यात आल्या.

या संयुक्त कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम, महसूल नायब तहसीलदार सायली जाधव, पोलीस निरीक्षक ब्रह्म गिरी, महिला पोलीस उपनिरीक्षक क्रांती ढाकणे, मंडळ अधिकारी विजय हिरवे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद मुळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल रामकिसन गीते, अशोक सांगळे, विजय दराडे, प्रवीण डोईफोडे, सुरेश डोईफोडे, परमेश्वर बुरकुल, सुषमा रगडे, संतोष चेके, गजानन ठाकरे, सोळंकी, महसूल सेवक कविता शिरसाठ तसेच खडकपूर्णा प्रकल्प उपविभागाचे सुरक्षा कर्मचारी पुरुषोत्तम भागीले उपस्थित होते.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!