स्मार्ट बुलढाणा

पाचव्या दिवशी आढळला तरुणांचा मृतदेह

खडकपूर्णा नदीत बुडाल्याची घटना

दुसरबीड,(प्रतिनिधी) :

राहेरी शिवारात येणाऱ्या खडकपूर्णा नदीपात्रात लाईनचे काम करत असताना पाण्यात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह घटनेच्या पाचव्या दिवशी मिळून आला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. गौतम अंबादास गवई (वय २२ वर्षे), असे मृत तरुणाचे नाव आहे.

ताडशिवणी येथील रहिवाशी असलेला अंबादास गवई (वय २२ वर्षे) हा तरुण १९ डिसेंबर रोजी राहेरी शिवारात येणाऱ्या खडकपूर्णा नदीपात्रात लाईनचे काम करत होता. काम सुरू असताना पाण्याची खोली व प्रवाहाचा अंदाज न आल्याने गौतम नदीत बुडाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच ग्राम महसूल अधिकारी गोरखनाथ पवार यांनी तहसीलदार अजित दिवटे यांना कळवले.यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एनडीआरएफचे पथक, पोलिस प्रशासन व महसूल विभागाच्या वतीने युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू केली. पोलीस निरीक्षक ताराचंद पवार यांच्या नेतृत्वाखाली सलग दोन दिवस नदीपात्रात शोध घेण्यात आला. तसेच पैठण येथील अनुभवी पाणबुड्यांनाही शोधकार्यासाठी पाचारण करण्यात आले.
दरम्यान, २४ डिसेंबर रोजी घटनेच्या पाचव्या दिवशी सायंकाळी साधारण चार वाजेदरम्यान गौतमचा मृतदेह खडकपूर्णा नदीत पाण्यावर तरंगताना आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह सिंदखेड राजा येथील ग्रामीण रुग्णालयात रवाना केला. या घटनेमुळे ताडशिवणी, राहेरी व परिसरात शोककळा पसरली असून, गौतमच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पुढील कायदेशीर प्रक्रिया पोलिसांकडून सुरू आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!